नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक भरती परीक्षेवर पेपरफुटीच्या संशयाचे सावट निर्माण झाले आहे. २२ मार्च रोजी झालेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतील तब्बल १०० पैकी ९० प्रश्न दोन दिवस आधी म्हणजे २० मार्चलाच व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणी उमेदवार गौरव पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल करत संपूर्ण भरती प्रक्रियेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. या आरोपांमुळे राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
गौरव पाटील यांनी ई-मेलद्वारे आयोग आणि अन्न व औषध प्रशासनाकडे पेपरफुटीबाबत तक्रार नोंदवली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने २४ जुलै रोजी त्यांचा जवाब नोंदवून घेतला. यावेळी त्यांनी सादर केलेले व्हॉट्सॲप संदेश, प्रश्नपत्रिकेचे कथित स्क्रीनशॉट आणि इतर उपलब्ध पुरावे प्रशासनाने ताब्यात घेतले असून, पुढील चौकशीसाठी हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविले आहे. या पुराव्यांची तांत्रिक पडताळणी करून सत्यता तपासली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आयोगाने आरोप फेटाळले
आयोगाने पेपरफुटीचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. परीक्षा पार पडली त्यावेळी किंवा निकाल जाहीर होण्यापूर्वी आयोगाकडे कोणतीही तक्रार प्राप्त झाली नव्हती. निकालानंतर संबंधित तक्रार प्राप्त झाली असून, तिची गांभीर्याने चौकशी सुरू केली आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
पाटील यांनी आरोप केला की, आयोगाकडे तक्रार करूनही त्याची वेळेत दखल घेतली नाही. जर पेपरफुटीचा संशय खरा असेल, तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांवर मोठा अन्याय झाला असून, संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याचाही विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणामागील दोषी व्यक्ती किंवा रॅकेटचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. चौकशीत पेपरफुटीच्या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. मात्र, आरोप पायाहीन/निराधार ठरल्यास आयोगाची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्धही कारवाई केली जाईल, असा इशाराही आयोगाने दिला आहे.