प्रदूषण  Pudhari
नाशिक

Jindal Saw Limited Sinnar Notice | जिंदाल'ला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस

Jindal Saw Limited Sinnar Notice | माळेगाव एमआयडीसी येथील जिंदाल सॉ लिमिटेड या उद्योगाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

माळेगाव एमआयडीसी येथील जिंदाल सॉ लिमिटेड या उद्योगाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. ही नोटीस उद्योगाने संमती अटींचे उल्लंघन केल्याच्या प्राथमिक निष्कर्षांवर आधारित असून, शेतकरी संजय गाडे यांनी केलेल्या तक्रारीनंतर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी गाडे मळा येथे पाहणी केली होती.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीदरम्यान उद्योगाच्या मागील बाजूस कंपाउंड वॉलमधून काळपट रंगाचे सांडपाणी बाहेर वाहात असल्याचे तसेच जुन्या व नवीन कंपाउंड वॉलच्या सांध्यातून संजय गाडे यांच्या शेतात पिवळ्या रंगाचे दूषित पाणी झिरपत असल्याचे निदर्शनास आले. उद्योगाने जल, वायू तसेच धोकादायक कचरा नियमांनुसार लागू असलेल्या अटी शर्तीचे पालन करणे बंधनकारक आहे.

प्राथमिक तपासणीनंतर उद्योगाकडून संमती अटींचे उल्लंघन झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून, त्यामुळे उद्योगाला 'उत्पादन तत्काळ का बंद करू नये आणि वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई का करण्यात येऊ नये?' याबाबत कारणे दाखविण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात शेतकऱ्याने वारंवार प्रदूषणाबाबत तक्रार करूनही कंपनीने डोळेझाक केली असल्याचे प्रकर्षाने जाणवल्याचे सांगण्यात येते.

प्रदूषण पातळी मर्यादेपेक्षा जास्त

पाणी नमुन्यांच्या अहवालात प्रदूषणाची पातळी निर्धारित मयदिपेक्षा जास्त असल्याचे समोर आले. एका नमुन्यात बीओडी ११० एजी / एल व सीओडी ३२० एजी / एल, तर दुसऱ्या नमुन्यात बीओडी ६२५ एमजी / एल व सीओडी १८२४ एमजी / एल इतके आढळून आले. मंडळाच्या मते हे निष्कर्ष पाण्याचे प्रदूषण दर्शवितात व निर्धारित निकषांचे उल्लंघन असल्याचे सूचित करतात.

'साहब, मीटिंग मे हैं' प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ

मंडळाने कंपनीला नोटीस प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास लागू कायद्यांनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. दरम्यान, प्रस्तुत प्रतिनिधीने जिंदाल कंपनीच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तथापि, 'साहब, मीटिंग मे हैं' म्हणत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT