नाशिक

Mother In Law Donates Kidney | सासूबाईंनी जावयाला दिले नवजीवन! 28 वर्षांपासून आजारी असलेल्या जावयासाठी दान केली स्वतःची किडनी

Mother In Law Donates Kidney | नात्यांमध्ये प्रेम, माया आणि जिव्हाळा असेल, तर संकटाच्या काळात माणूस आपल्या माणसासाठी कोणत्याही परिस्थितीत उभा राहतो.

पुढारी वृत्तसेवा

कळवण : पुढारी वृत्तसेवा
नात्यांमध्ये प्रेम, माया आणि जिव्हाळा असेल, तर संकटाच्या काळात माणूस आपल्या माणसासाठी कोणत्याही परिस्थितीत उभा राहतो. याची हृदयस्पर्शी प्रचिती बेज येथे आली आहे. अंतापूर येथील रखमाबाई खैरनार यांनी बेज येथील त्यांचे जावई रवींद्र गांगुर्डे यांच्यासाठी स्वतःची किडनी दान करून त्यांना नवजीवन देण्याचा धाडसी निर्णय घेतला.

सासू-जावयाच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि माणुसकीचे हे अनोखे उदाहरण परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे. बेज येथील शेतकरी रवींद्र गांगुर्डे (धर्मा तात्या) हे सन १९९८ पासून म्हणजेच गेल्या २८ वर्षांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर नियमित उपचार सुरू होते.

मात्र, कालांतराने त्यांच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण होऊन किडनी प्रत्यारोपणाची गरज निर्माण झाली. त्यामुळे गांगुर्डे कुटुंबीयांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. अशा परिस्थितीत रवींद्र यांच्या सासू रखमाबाई खैरनार यांनी पुढाकार घेत जावयासाठी स्वतःची किडनी दान करण्याची तयारी दर्शविली.

रक्ताचे नाते नसतानाही त्यांनी रवींद्र यांना मुलाप्रमाणे मानून हा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे कुटुंबीय भावुक झाले. त्यानंतर आवश्यक वैद्यकीय तपासण्या, रक्तगट व इतर वैद्यकीय चाचण्या तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. अखेर नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये गांगुर्डे यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली.

या उपचार प्रक्रियेत नेफ्रोलॉजिस्ट डॉ. प्रकाश उगले, युरॉलॉजिस्ट सर्जन डॉ. प्रवीण गोवर्धने, डॉ. किशोर वाणी तसेच किडनी ट्रान्सप्लांट समन्वयक चारुशीला जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रखमाबाई यांच्या या निर्णयातून माणुसकीला नात्यांच्या पलीकडे नेणारा संदेश समाजासमोर आला. अवयवदानाचे महत्त्वही अधोरेखित झाले आहे. त्यांच्या त्यागाचे परिसरातून कौतुक होत आहे.

"रवींद्र हे जावई असले तरी मी त्यांना मुलगा मानते. त्यांच्या आजाराबद्दल कळल्यानंतर माझ्यामुळे त्यांना मदत होऊ शकत असेल, तर मागे हटण्याचा प्रश्नच नव्हता. माझी किडनी त्यांच्या उपयोगी पडून त्यांना निरोगी आयुष्य मिळावे, एवढीच माझी इच्छा. आता प्रत्यारोपण यशस्वी झाल्याचे समाधान आहे."
- रखमाबाई खैरनार, अंतापूर
"प्रत्यारोपणाची वेळ आली तेव्हा कुटुंबीय चिंतेत होते. मात्र, माझ्या सासूबाईंनी स्वतःची किडनी देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा त्याग मी आयुष्यभर विसरणार नाही. त्यांनी सासू म्हणून नव्हे, तर आई म्हणून साथ दिली."
- रवींद्र गांगुर्डे (धर्मा तात्या), नवी बेज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT