चांदवड : सीमेंट गट्टूची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटून रमिता सोलंकी व तिची मुले रियान (2) आणि दीपक (5) यांचा जागीच मृत्यू झाला. यासह चार जण गंभीर जखमी झाले आहे. बुधवारी सकाळी 11.30च्या सुमारास चांदवड-मनमाड रोडवर कांद्याच्या खळ्यांसमोर हा अपघात घडला.
मनमाडजवळील नागापूर येथून सीमेंटचे गट्टू भरलेली (विनानंबरची) ट्रक चालक शेखर साठे (26, रा. नागापूर) हा चांदवडकडे घेऊन येत होता. या अपघातात ट्रकच्या पाठीमागे बसलेले कामगार रंजित सोलंकी (19), राजेश सोलंकी (25), सारधी सोलंकी (22), परवेश यादव (22) गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गांगुर्डे यांनी उपचार केले. सर्व मजूर चोपला (ता. सेंधवा, जि. बडवाणी) येथील असून, सध्या नागापूर येथे वास्तव्यास होते.
अपघाताची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गांगुर्डे यांनी जखमींना उपचार केले. अपघातानंतर वाहतूक ठप्प झाली होती. पोलिस निरीक्षक कैलास वाघ, उपनिरीक्षक भानुदास नऱ्हे, हवालदार स्वप्निल जाधव, अमोल जाधव, दिनेश सुळे यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.