नाशिक : सध्या पावसाळा सुरू असून सर्वसाधारणपणे या काळात डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढतो. यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, जपानी एनसेफलायटीस आणि फिलारियासिस हे प्रमुख आजार बळावतात. हा प्रत्येक आजार विशिष्ट डासांमुळे पसरला जातो. उदा. एनोफिलीस डासांमुळे मलेरिया होतो, एडिस इजिप्ती डासांमुळे चिकुनगुनिया, डेंग्यू आणि झिका आणि क्युलेक्स डासांमुळे जपनीज इंसेफालयटीस आणि फिलारियासिस होतो. या आजारांपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.
मुलाला डेंग्यू, मलेरिया किंवा चिकनगुनिया झाले आहे हे कसे ओळखावे? याबाबत तापाच्या सुरुवातीच्या काळात इतर विषाणूंच्या तापासारखी लक्षणं दिसतात. आजाराच्या सुरुवातीला ताप, डोकेदुखी, अंगदुखी दिसून येते आणि कधीकधी उलटी देखील होते.
चिकुनगुनिया : वरील सर्व लक्षणांच्या बरोबर चिकुनगुनियामध्ये सांधे खूप दुखतात आणि पाठही खूप दुखते. हातापायाचे छोटे सांधे या आजारांमध्ये जास्त प्रमाणात आखडतात. मोठे सांधे फारसे आखडत नाहीत.
डेंग्यू : यामध्ये डोळ्यात आणि डोळ्याच्या पाठीमागे खूप दुखते आणि नायू व हाडे दुखतात, सांधे दुखत नाहीत.
मलेरिया : (हिंवताप) ह्यात खूप थंडी वाजून ताप येतो. मलेरिया सोडल्यास इतर दोन्ही आजारांमध्ये शरीरावर बारीक पुरळ येतात. काही वेळेला रक्तस्रावाचे छोटे- छोटे ठिपके त्वचेवर आणि तोंडाच्या आतील भागामध्ये दिसून येतात. डेंग्यूमध्ये हात पाय, चेहरा आणि शरीर पूर्ण लाल भडक दिसू लागते.
मलेरिया सोडल्यास डेंग्यू आणि जापनीज इंसेफालयटीस ला बरे करणारे कोणतेही औषध नाही.जापनीज इंसेफालयटीस साठी लस उपलब्ध आहे. हे बालरोगतज्ञाबरोबर चर्चा करून मुलांना द्या. जिथे जापनीज इंसेफालयटीसची साथ आहे, त्या भागात लस घ्या. सध्या इतर आजारांसाठी भारतात कोणतीही लस उपलब्ध नाही. डेंग्यूसाठी ची लस परीक्षणाच्या शेवटच्या टप्प्यावर आहे आणि सुरक्षित आणि गुणकारी असल्यास नजीकच्या भविष्यकाळात ती उपलब्ध होईल. हे सर्व आजार टाळण्याचा सर्वात महत्त्वाचा भाग डास चावू न देणे आणि डासांची उत्पत्ती ज्या ठिकाणी होते त्या जागा नष्ट करणे आहे. जेथे डासांची उत्पत्ती होते अशा ठिकाणी डास चावण्याची शक्यता असतेच मग ते घर असो वा शाळा. डास चावण्याच्या प्रतिबंधासाठी घरी वैयक्तिक पातळीवर सर्व दरवाजे आणि खिडक्यांना पुरेशा डासाच्या जाळ्या लावाव्यात आणि त्यात कुठल्याही प्रकारची छिद्र पडल्यास ती ताबडतोब दुरुस्त करावीत तसेच झोपताना पाळण्याला किंवा पलंगाला मच्छरदाणी लावावी. ती अतिशय चपखल बसणारी असावी. मच्छरदाणी पांढऱ्या रंगाची चौकोनी आणि १५६ छिद्र प्रति स्क्वेअर इंच असलेली असावी आणि त्याचे पुरेसे लांब टोक बिछान्याच्या खाली पोचता येईल असे असावे.
डासांचे नियंत्रण : घर असो किंवा शाळा पाणी साठू देऊ नये. त्यामुळे डास उत्पत्ती होण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होणार नाही, डासांना त्यांची अंडी घालता येणार नाहीत. उघडे टायर, कॅन, आणि कुंड्या अशा कोणत्याही गोष्टी ज्यामध्ये पावसाचे पाणी साठू शकते आणि त्यात डासांची अंडी बाडू शकतात अशा वस्तू फेकून दिल्या पाहिजेत. कुलर, फुलदाणी आणि पक्षीखानासाठी केलेले हौद यातील पाणी सतत बदलत राहावे, गटारे स्वच्छ ठेवावीत आणि त्याचा पुरेसा निचरा होईल याकडे लक्ष ठेवावे.. पाण्याचे सर्व खोत पूर्णपणे झाकलेले असावेत. जे पाणी, पिण्यासाठी वापरले जाणार नाही, अशांमध्ये अळीप्रतिबंधक औषधे घालावीत.- डॉ. अजिंक्य रूपनर, बालरोग तज्ज्ञ, नाशिक.