जायखेडा : बागलाण तालुक्यात दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईमुळे मोसम खोऱ्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. आता पाणी मिळाले नाही, तर आमच्या पिकांसोबत आम्हीही संपून जाऊ, अशा हतबल शब्दांत शेतकरी आपली व्यथा मांडत आहेत. हरणबारी धरणातून तातडीने पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी आता गावागावांतून जोर धरू लागली आहे.
मोसम खोऱ्यात उष्णतेने अक्षरशः थैमान घातले आहे. विहिरी, कूपनलिका, तलाव आणि ओढे कोरडे पडल्याने ग्रामीण भागातील पाणीस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. जमिनीला भेगा पडू लागल्या असून, हिरवीगार पिके तहानेने करपू लागली आहेत. अनेक गावांमध्ये महिलांना हंडाभर पाण्यासाठी पहाटेपासून रांगा लावाव्या लागत आहेत. वृद्ध, महिला आणि लहान मुलांची पाण्यासाठी होणारी धावपळ पाहून हृदय पिळवटून निघत आहे.
या भीषण परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतकरीवर्गाला बसत आहे. टोमॅटो, मिरची, फ्लॉवर, कोबी, भेंडी, गिलके, दोडके, गवार, कारले, टरबूज तसेच डाळिंबासह विविध भाजीपाला आणि फळबागा पाण्याअभावी करपू लागल्या आहेत. कर्ज काढून, संसाराची बचत खर्च करून उभे केलेले पीक डोळ्यांसमोर नष्ट होत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे.
काही शेतकरी विहिरीतील शेवटचा थेंब वाचवण्यासाठी रात्रभर मोटारी सुरू ठेवत आहेत, तर काहींना जनावरे वाचवण्यासाठी घरातील दागिने गहाण ठेवण्याची वेळ आली आहे. पिकाला पाणी द्यावे की लेकरांना? असा सवाल अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत दिसत आहे. शेतीवरच संसाराचा गाडा चालणाऱ्या कुटुंबांसमोर आता उपासमारीचे संकट उभे राहिले आहे.
अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून ठिबक सिंचन यंत्रणा उभारली, बियाणे व खतांवर मोठी गुंतवणूक केली; मात्र पाण्याअभावी संपूर्ण मेहनत वाया जाण्याच्या मार्गावर आहे. आधीच अवकाळी पाऊस, गारपीट, कमी बाजारभाव आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता पाणीटंचाईचा आणखी एक मोठा घाव बसला आहे.
फक्त पिकेच नव्हे, तर जनावरांचे हालही असह्य झाले आहेत. गुरांना पाणी पाजण्यासाठी शेतकऱ्यांना मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. जनावरं म्हणजे आमच्या कुटुंबाचा भाग आहेत; ती वाचली तरच आम्ही जगू, असे सांगताना अनेक शेतकऱ्यांचे डोळे पाणावले.
हरणबारी धरणावर बागलाण आणि मालेगाव तालुक्यातील सुमारे दीडशे गावे अवलंबून आहेत. धरणातून तातडीने आवर्तन सोडल्यास मोसम खोऱ्यातील सुमारे ४५ गावांना मोठा दिलासा मिळू शकतो. सुमारे ११६६ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या या धरणाकडे आता हजारो शेतकरी आशेने पाहत आहेत.
मोसम खोऱ्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून, अनेक शेतमजुरांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. पाणीटंचाईमुळे आगामी खरीप हंगाम धोक्यात आला असून, वेळेत पाणी उपलब्ध झाले नाही, तर हजारो शेतकरी पुन्हा कर्जबाजारीपणाच्या खाईत जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. आमच्या पिकांना पाणी द्या आमच्या संसाराला जीवदान द्या, अशी आर्त हाक आता संपूर्ण मोसम खोऱ्यातून उमटत आहे.