नाशिक : संततधार आणि धरणांतून सुरु असलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीला आलेला पूर  (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Monsoon Weather News : संततधार जलधारांनी नद्या, नाले तुडुंब

धरण समूहात ६३ टक्के साठा : गंगापूर, दारणा, कडवा, भोजापूर, भावली धरणांमधून विसर्ग

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, शनिवारी (दि. ५) संततधार सुरू राहिल्याने नद्या, नाले तुथडी वाहात आहेत. दिवसभरात २०.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील धरणसमूहात ६३.५५ टक्के साठा झाला आहे. यातील भावली, भोजापूर 100 टक्के भरली आहेत तर दारणा, गंगापूर, कडवा या क्षेत्रांत जोरदार पाऊस सुरू असल्याने, या धरणांतून विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; २०.४ मिमी पावसाची नोंद

  • भावली, भोजापूर १०० टक्के भरले

  • जायकवाडीला १६,५३९ दलघफू पाणी रवाना

  • दारणातून ५६,१८०, तर गंगापूरमधून ३७,८८९ क्यूसेक विसर्ग

जिल्ह्यात ७ मे पासून पाऊस सुरू आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभापर्यंतच गोदेला पाचवा पूर आला आहे. गंगापूर धरण क्षेत्रातून विसर्ग सुरू आहे. आतापर्यंत ३७ हजार ८८९ क्यूसेक विसर्ग झाला असून, शनिवारी यात वाढ झाली. दारणातून सर्वाधिक ५६ हजार १८० क्यूसेक पाणी विसर्ग झाला आहे. शनिवारी सकाळपर्यंत 5 हजार १६२ क्यूसेक विसर्ग झाला. सायंकाळी ५ नंतर त्यात १ हजार ४८० ने वाढ करून ६ हजार ६४२ क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर कडवा, भोजापूर, नांदूरमध्यमेश्वर धरणांमधूनही विसर्ग सुरू आहे. दरम्यान, संततधार पावसामुळे पेरणीची कामे खोंळबली आहेत. गत आठवड्यापर्यंत पेरणी क्षेत्र ३१ टक्क्यांवर आले होते. यंदा मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग, ज्वारी, कापूस या पिकांची सर्वाधिक लागवड केली जात आहे. भात भात लागवडीला आला आहे.

जायकवाडीला १६,५३९ दलघफू पाणी रवाना

जिल्ह्यातील समाधानकारक पाऊस होत असल्याने, मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे सातत्याने पाणी रवाना केले जात आहे. आतापर्यंत दारणातून ४,८५६, गंगापूरमधून ३,२७२, भावली ४१, भोजापूर १०, तर नांदूरमध्यमेश्वरमधून ७,७९९ असे एकूण १६ हजार ५३९ दलघफू पाणी जायकवाडीकडे रवाना झाले आहे. त्यामुळे जायकवाडीला आतापर्यंत 16 हजार 539 दलघफू पाणी रवाना झाले आहे. यामुळे मराठवाड्याचा पाणीप्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागणार आहे.

प्रमुख धरणांतील साठा (टक्के)

  • गंगापूर - ५६.८७

  • दारणा - ५८.०१

  • कश्यपी - ७३.७६

  • गौतमी गोदावरी - ६०.४९

  • पालखेड - ५३.७५

  • वाघाड - ६१.९९

नागासाक्या, तिसगाव क्षेत्रांत पावसाची प्रतीक्षा

जिल्ह्यातील २३ धरणांपैकी चार धरण क्षेत्रांना अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. विशेषत: नांदगावमधील नागासाक्या धरण अवघे १७.१३ टक्के भरले आहे. दिंडोरीतील तिसगाव २४.६२ आणि ओझरखेड ४१.३६ टक्के भरले आहे, कळवणमधील चणकापूर ४५.५३ टक्के भरले आहे.

नदी क्षेत्र परिसरात काही साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हटवण्यात यावीत. नागरिकांनी सतर्क राहावे. खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सोनल शहाणे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

तरुणांच्या धाडसामुळे वाचले प्राण

गोदावरीला पूर आलेला असून शनिवारी दारूच्या नशेतील व्यक्तीचा तोल जाऊन तो गोदापात्रात पडला आणि वाहून जाऊ लागला. तीन युवकांनी प्रसंगावधान दाखवत कोणतीही भीती न बाळगता तत्काळ पाण्यात उड्या मारल्या. तीनही मुलांनी त्या व्यक्तीला पकडले आणि जोरदार प्रवाहाशी झुंज देत त्याला किनाऱ्यावर आणले. घटनेच्या वेळी तेथे सुरक्षारक्षक उपस्थित होते. मात्र, ही व्यक्ती पाण्यात कशी पडली, याबाबत कोणालाही काहीही माहिती नव्हते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT