Moneylender Pintu Shinde arrested in extortion case np88
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
व्याजाने दिलेल्या पैशाच्या बदल्यात प्लॉट बळकावत पिस्तुलाचा धाक दाखवून आठ लाख रुपयांची खंडणी उकळण्याची घटना सप्तशृंगगड येथे घडली होती. या प्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर नाशिकरोड मुक्तिधाम परिसरातील सावकार चंद्रशेखर प्रभाकर शिंदे ऊर्फ पिंटू शिंदे यास गुन्हे शाखा १ च्या पथकाने बेड्या ठोकल्या असून त्याचा साथीदार अजय दुबे फरार झाला आहे. या संदर्भात किरण भास्कर कानडे यांनी तक्रार दिली आहे.
फिर्यादीने व्यवसाय करण्यासाठी व्याजाने पिंटू शिंदे यांच्याकडून तीन लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात शिंदे याने फिर्यादी व त्याच्या भावाच्या नावावर असलेला प्लॉट साठेखत करत जबरदस्तीने लिहून घेतला. व्याजाची रक्कम वेळेवर देऊ न शकल्याने फिर्यादीचे उदरनिर्वाहाचे साधन असलेले हॉटेल गौतमी आणि आणि फिर्यादीचे वडिलोपार्जित घर हे सुद्धा रजिस्टर खरेदीखत करून लिहून घेतले.
खरेदी खताच्या आधारे कळवण येथील अंबिका पतसंस्थेतून स्वतः च्या नावे कर्ज घेऊन त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी फिर्यादीला पिस्तुलाचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. खरेदीखत केलेले घर परत पाहिजे असेल तर १५ लाख रुपयांची खंडणीची मागणी करत धमकावले. त्या बदल्यात आठ लाख रुपये जबरदस्तीने खंडणी स्वरूपात वसूल केले. याबाबत उपनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर तपास करत आहेत.