नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयात माॅकड्रिल'च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली तयारी.  (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Mock Drill Nashik | 'माॅकड्रिल'साठी प्रशासन सज्ज; बघा.. प्रात्यक्षिक सायंकाळी 4 वाजता

भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जम्मू- काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला झाल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून भारतानेही कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, पाकिस्तानकडूनही पलटवार होण्याची शक्यता आहे.

युद्ध छेडल्यास नागरी क्षेत्रावर हल्ले झाल्यानंतर नागरिकांनी काय काळजी घ्यावी, सुरक्षेच्या उपाययोजना काय कराव्यात यासाठी केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना बुधवारी (दि.७) मॉकड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील नाशिक शहरासह सिन्नर व मनमाड येथे आज मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे.

केंद्र सरकारच्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. देशातील २४४ सिव्हिल डिफेन्स डिस्ट्रिक्ट (नागरिक सुरक्षा जिल्हे) मध्ये हे मॉकड्रिल होणार आहे. यामध्ये नाशिकचा समावेश होतो. म्हणून मॉकड्रिलसाठी नाशिकचीही निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख अधिकार्‍यांची बैठक झाली. बैठकीत भारतीय सैन्य दलाचे अधिकारीही उपस्थित होते. यासंदर्भात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले की, ७ मे रोजी सायंकाळी ४ वाजता केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात मॉकड्रिल होणार आहे.

एअर रेड, फायर रेस्क्यू आणि ब्लॅक आउट या तीन भागांत हे मॉकड्रिल विभागले जाईल. यामध्ये पोलिस विभाग, अग्निशमन विभाग, सिव्हिल डिफेन्स, एनसीसी, एनएसएस त्याचप्रमाणे सुरक्षा संदर्भातील सर्व विभागांचा सहभाग असेल. मॉकड्रिल कशा स्वरूपाचे असेल याच्या संदर्भामध्ये मात्र प्रशासनाकडून गुप्तता पाळली आहे.

मॉकड्रिल संदर्भात सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात असल्याचे समजते. मात्र नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. मॉकड्रिल हा नियमित सरावाचा एक भाग असून, बुधवारीदेखील हे मॉकड्रिल होणार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या अधिकृत माहितीवरच नागरिकांनी विश्वास ठेवावा.
जलज शर्मा,जिल्हाधिकारी, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT