नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दुय्यम निबंधक कार्यालयात महापुरुषांच्या छायाचित्रांच्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. त्याचा आकार इतर छायाचित्रांच्या तुलनेत मोठा असल्याने त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्षेप घेतला आहे. पंतप्रधानांचे छायाचित्र महापुरुषांच्या रांगेत न लावता स्वतंत्र भिंतीवर शासकीय नियम व प्रोटोकॉलनुसार योग्य आकारात लावावे, अशी मागणी 'मनविसे'ने केली आहे.
पुढील दोन दिवसांत कारवाई न झाल्यास 'मनसे स्टाईल'ने आंदोलन करण्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातील छायाचित्रांच्या मांडणीबाबत मनविसेने प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांच्या छायाचित्रांच्या रांगेत पंतप्रधानांचे छायाचित्र लावण्यात आले आहे.
पंतप्रधानांच्या छायाचित्राचा आकार इतर छायाचित्रांपेक्षा मोठा आहे. महापुरुषांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान ऐतिहासिक असून, त्यांच्या विचारांचा व कार्याचा सन्मान राखणे आवश्यक आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधान ही देशातील सर्वोच्च घटनात्मक पदे आहेत.
त्यामुळे या पदांचा सन्मान राखतानाच महापुरुषांच्या ऐतिहासिक योगदानाचाही स्वतंत्रपणे सन्मान करता येतो. त्यासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची छायाचित्रे शासकीय नियम व प्रोटोकॉलनुसार स्वतंत्र जागी लावावीत, अशी भूमिका 'मनविसे'ने मांडली आहे.
महापुरुषांच्या रांगेत राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांची छायाचित्रे लावण्याऐवजी त्यांच्यासाठी स्वतंत्र जागा ठेवावी, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज आणि अमित ठाकरे यांनी यापूर्वी मांडल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पद आणि सरकार बदलू शकते. मात्र, महापुरुषांचे ऐतिहासिक योगदान कायम राहते. त्यामुळे शासकीय कार्यालयांत छायाचित्रांची मांडणी करताना समान निकष व शासकीय नियमांचे पालन केले पाहिजे, असे 'मनविसे'ने म्हटले आहे. यावेळी 'मनविसे'चे जिल्हाध्यक्ष ललित वाघ, जिल्हासचिव नागेश काठोले, शहर कार्याध्यक्ष सदस्य नीरज भालेराव, ईशान साळुंके, उपशहराध्यक्ष मोहित पाटील, विभागाध्यक्ष मयूर जैन, विभाग सचिव दर्शन बोरसे पदाधिकारी उपस्थित होते.
दोन दिवसांचा अल्टीमेटम:
दुय्यम निबंधक कार्यालयातील छायाचित्रांची मांडणी तातडीने बदलून महापुरुषांची छायाचित्रे स्वतंत्र सन्मानपूर्वक रांगेत, तर राष्ट्रपती व पंतप्रधानांची छायाचित्रे स्वतंत्र जागी लावावीत, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, या मागणीवर गांभीर्याने विचार करून दोन दिवसांत छायाचित्रांची जागा बदलावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा 'मनविसे'ने दिला आहे.