नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महाविकास आघाडीत मनसेच्या सहभागाची घोषणा होताच काँग्रेस पक्षातील मतभेद समोर आले आहेत. नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाने मनसे बरोबर जाण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याची 'एक्स'पोस्ट काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केल्याने काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी तोंडघशी पडले आहेत. दरम्यान, निर्णय नाशिकपुरता असावा असे सांगत, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत मात्र काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचा दावा केला आहे, तर मनसेकडून असा कोणताही प्रस्ताव आला नसून अशी पत्रकार परिषद झाली नसल्याचे सांगत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना एकटे पाडले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मनसेच्या समावेशावरून प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोमवार (दि.१०) शिवसेना(उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, डावे पक्षांसहीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत महायुतीला रोखण्यासाठी निवडणुका एकत्र लढविणार असल्याचे जाहीर केले. मात्र, या नंतर अवघ्या तासाभरातच काँग्रेसमधील विसंवाद समोर आला आहे. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसारच स्थानिक परिस्थिती बघून आम्ही मनसे सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे काँग्रेसचे प्रदेश सचिव राहूल दिवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्यानंतर काही वेळातच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी एक्स पोस्टद्वारे नाशिकमध्ये काँग्रेससोबत मनसेची कोणतीही युती होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पक्षाने मनसेसोबत जाण्याचा कोणताही निर्णय घेतला नसून याबाबतच्या बातम्या चुकीच्या असल्याचे स्पष्ट करत, सावंत यांनी स्थानिक नेत्यांनाच तोंडावर पाडले आहे, तर विजय वडेट्टीवार यांनी वेगळाच सूर व्यक्त केला आहे. स्थानिक पातळीवर सर्व राजकीय परिस्थिती बघून निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे स्थानिकांनी हा निर्णय घेतला असावा असे सांगत, मुंबईत मात्र आम्ही स्वबळावरच लढणार असल्याचे सांगत,सावंत यांच्या पेक्षा वेगळी भूमिका व्यक्त केली आहे. तर हर्षवर्धन सपकाळ यांनीही मनसेकडून असा प्रस्ताव आला नसल्याचे सांगत, या पत्रकार परिषदेबाबत कानावर हात ठेवत, नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना एकटे पाडले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मनसेच्या समावेशावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या वरिष्ठांच्या सूचनेवरून स्थानिक पातळीवर मनसेसोबत निवडणुका लढविण्याचा विचार आहे. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे प्रस्ताव पाठवून निर्णय घेतला जाईल.राहुल दिवे, प्रदेश सचिव, काँग्रेस