

MNS Deepotsav : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या शुक्रवारी, १७ तारखेला एकाच मंचावर दिसणार आहेत.
मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. राज ठाकरे यांच्यासाठी हा क्षण विशेष आहे, कारण पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
मागील काही महिन्यांपासून दोन्ही ठाकरे बंधूंमधील भेटीगाठी वाढल्या आहेत. स्नेहभोजन असो, किंवा कौटुंबिक समारंभ, राज आणि उद्धव ठाकरे अनेकदा एकत्र आले आहेत. आता दीपोत्सवाच्या निमित्ताने हे दोन्ही नेते पुन्हा एकदा सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येत असल्याने, राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठींना विशेष महत्त्व आहे. शुक्रवारी (१७ तारखेला) होणाऱ्या या दीपोत्सव उद्घाटन सोहळ्यात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना एकत्र येणे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.