नाशिक : मराठी भाषेच्या मुद्यावरून वरळीत झालेल्या विजयी मेळाव्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेने शिवसेना (उबाठा गट) आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. मात्र, राज ठाकरे यांच्या नव्या आदेशामुळे हा उत्साह काहीसा ओसरला आहे.
युतीबाबत कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करण्यापूर्वी त्यांनी माझी परवानगी घ्यावी, असे निर्देश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याने युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे राज आता नेमकी काय भूमिका घेणार? युती होणार की नाही? या प्रश्नांनी नाशिकमधील उबाठा आणि मनसे कार्यकर्त्यांची धडधड वाढवली आहे.
राज्याच्या राजकारणात नाशिक नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहे. १९९४ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिकमधूनच 'दार उघड बये दार' अशी साद घातली होती. त्या अधिवेशनानंतर राज्यात १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले होते. शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी जानेवारी २०२४ मध्ये उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये पुन्हा अधिवेशन घेत साद घातली. या निवडणुकीनंतर केंद्रात भाजपची सत्ता कायम राहिली असली तरी, नाशिकमधून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव करत महाविकास आघाडी अर्थात शिवसेने (उबाठा)चे राजाभाऊ वाजे यांना नाशिककरांनी खासदार बनवत केंद्रात पाठविले. 'मनसे'साठीही नाशिकचे महत्त्व कायम राहिले आहे. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत नवीन पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांना मुंबईनंतर सर्वाधिक पाठिंबा नाशिकमधूनच मिळाला होता. किंबहुना २००९ च्या विधानसभा निवडणुकीत नाशिककरांनी तीनही जागा मनसेच्या झोळीत टाकल्या होत्या. इतकेच नव्हे तर, २०१२ च्या महापालिका निवडणुकीत सर्वाधिक ४० नगरसेवक निवडून देत नाशिक महापालिकेची सत्ताही राज ठाकरेंच्या हाती सोपविली होती. त्यामुळे नाशिक हा सुरुवातीला शिवसेना आणि त्यानंतर मनसेचा गड राहिला आहे. बदलच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र यावेत, ही मूळ भावना नाशिकमधील उबाठा-मनसे कार्यकर्त्यांमधूनच प्रसूत झाली. त्यामुळेच जेव्हा राज-उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना प्रतिसाद दिला तेव्हा राज्यात सर्वात प्रथम नाशिकमधूनच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले. हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधूंनी एकत्र येत संयुक्त मोर्चाची हाक दिल्यानंतर या मोर्चाला सर्वाधिक रसद नाशिकमधून पुरविली जाईल, हे स्पष्टच होते.
महायुती सरकारने हा निर्णयच मागे घेतल्यानंतर वरळीत आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त मेळाव्यात नाशिकमधून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या गळ्यात गळे घालत सोबतच वाजतगाजत निघाले होते. संपूर्ण ठाकरे कुटुंब एका मंचावर पाहिल्यानंतर दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते सुखावले. राज आणि उद्धव यांच्यातील दुरावा कायमस्वरूपी मिटला. त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारत जुन्या गोष्टींवर कायमस्वरूपी पडदा पाडला. या कार्यक्रमानंतर राज्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता त्यात एक मोठा ट्विस्ट आला आहे. राज ठाकरे यांनी नुकतीच एक बैठक घेतली. त्यात त्यांनी 'उबाठा'सोबत संभाव्य युती करण्यासंदर्भात कोणत्याही पदाधिकाऱ्याने सार्वजनिकपणे बोलण्यापूर्वी माझ्याशी संपर्क साधून परवानगी घ्यावी, असे निर्देश दिले. या आदेशामुळे नाशिकमधील दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत.
मुंबईत झालेल्या विजयी मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एका मंचावर आले. जे २० वर्षांत घडले नाही ते आता घडले. महाराष्ट्राच्या मनात जे होते ते घडले. यापुढील काळातही महाराष्ट्राच्या हिताचेच घडेल. कार्यकर्त्यांनी संयम पाळायला हवा.दिनकर पाटील, प्रदेश सरचिटणीस, मनसे.