MLA Suhas Kande's help for flood victims in Punjab
मनमाड : पुढारी वृत्तसेवा
पंजाबमध्ये आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. या संकटग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त होणारा कार्यक्रम रद्द करत नऊ लाख रुपयांची मदत दिली आहे. त्यांच्या वतीने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. ८) गुरुद्वारात जाऊन मदतीचा धनादेश प्रबंधक बाबा रणजितसिंग यांच्याकडे सुपूर्द केला.
आ. कांदे यांचा वाढदिवस मनमाड, नांदगाव शहरासह मतदारसंघातील जनतेकडून जल्लोषात साजरा केला जातो. यानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. मात्र, यंदा पंजाबमध्ये महापुरामुळे असंख्य घरे वाहन गेल्यामुळे लाखो नागरिक बेघर झाले आहेत, अशा वेळी वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना मदतीचा निर्णय आ. कांदे यांनी घेतला. दरम्यान, मदतीचा धनादेश गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजितसिंग यांच्याकडे सुपूर्द करताना माजी आ. राजेंद्र देशमुख, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, अल्ताफ खान, राजाभाऊ भाबड, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे, राजाभाऊ पगारे, नाना शिंदे, संजय कटारिया, गंगा त्रिभुवन, महिंद्र शिरसाठ, कैलास गवळी, विकी जट, राजू जाधव, लाला नागरे, सुभाष माळवतकर, दिनेश घुगे, संजय चावरिया, महेश बोराडे, वल्लभलहिरे, अमोल दंडगव्हाळ, गुरदीप सिंग आदींसह शिवसेना, भाजप, रिपाइं कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
देशाच्या जडणघडणीत पंजाबचा सिंहाचा वाटा आहे. स्वातंत्र्यासाठी शीख बांधवांनी मोठा त्याग केलेला आहे. आज पंजाबवर आभाळ कोसळले आहे. तेथील दृश्य पाहून डोळ्यात पाणी आले. या संकटकाळी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.- सुहास कांदे, आमदार, नांदगाव मतदारसंघ