वैतरणानगर : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची विचारपूस करताना भगवान मधे. 
नाशिक

Six missing Ashram school students found safe | आश्रमशाळेतील बेपत्ता सहाही विद्यार्थी सुखरूप सापडले

शेतातील ऊस खाल्ल्याने शेतकऱ्याने तक्रारीचा दम दिल्याने घाबरले होते

पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी : तालुक्यातील वैतरणानगर येथील शासकीय आश्रमशाळेतून गुरुवारी (दि. २७) दुपारच्या सुमारास बेपत्ता झालेले सहाही विद्यार्थी रात्री उशिरा सुखरूप सापडले. विद्यार्थ्यांना बिबट्याचा वावर असलेल्या धारगाव परिसरातून सुरक्षितपणे बाहेर काढून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मुले सुखरूप घरी परतल्याने पालक, शिक्षक आणि शाळा प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.

सहाही विद्यार्थी शाळेतून गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांचा शोध घेत असताना ते वाटेतील शेतात गेले असल्याची माहिती समोर आली. तेथे त्यांनी ऊस तोडून खाल्ल्याचे सांगण्यात आले. संबंधित शेतकऱ्याने विद्यार्थ्यांना पकडून शाळेत तक्रार करण्याचा दम दिल्यामुळे ते घाबरून धारगाव परिसरातील एका ठिकाणी जाऊन बसणे पसंत केले होते.

विद्यार्थी सुखरूप सापडल्यानंतर त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेनंतर एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. भविष्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी मुख्याध्यापकांना केले.

विद्यार्थी सापडल्यानंतर शिक्षक आणि पालकांनी त्यांची विचारपूस करून त्यांची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी सहकार्य करणारे शिक्षक, प्रशासन आणि ग्रामस्थांचे पालकांनी आभार मानले. या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

बिबट्याच्या वावर ; टॉर्चच्या उजेडात शोधमोहीम

विद्यार्थी बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात जाऊन बसले होते. तेथे काही अंतरावर वैतरणा धरणाचे पाट असून, बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने दोन पिंजरेही लावले आहेत. शोधमोहीम सुरू असताना फुटेजमध्ये विद्यार्थी दिसून आले. त्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि ग्रामस्थांनी रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या उजेडात विद्यार्थ्यांचा शोध सुरू केला. एकाने विद्यार्थी एका ठिकाणी बसल्याचे पाहिल्यानंतर त्यांना धीर देऊन बाहेर काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT