child marriage Pudhari
नाशिक

Child Marriage| 16 वर्षांच्या मुलीचे 37 वर्षांच्या पुरुषाशी लग्न; पिंपळगावात आईसह दोघांवर पोलिसांची कारवाई

Child Marriage| 37 वर्षीय व्यक्तीसोबत विवाह; आईसह दोघांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : पुढारी वृत्तसेवा
परिसरात अल्पवयीन मुलीचा विवाह ३७ वर्षीय व्यक्तीसोबत लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिचा विवाह लावून दिल्याप्रकरणी पिंपळगाव पोलिसांनी मुलीची आई आणि अन्य एका व्यक्तीविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव बसवंत येथील तुळजाभवानी मंदिरामागील स्व. दगु नाना मोरेनगर परिसरात १६ वर्षे ३ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह ३७ वर्षीय व्यक्तीसोबत लावून देण्यात आला. विवाहासाठी पिंपळगाव बसवंत येथील एका हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आल्याचेही नोंदीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पिंपळगाव पोलिसांनी तातडीने दखल घेत अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला याप्रकरणी तिच्या आईसह संबंधित व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली. उपलब्ध पोलिस नोंदीनुसार, अल्पवयीन मुलीची आई आणि नवरदेव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालविवाहासंदर्भात माहिती कळवा

या प्रकरणाची नोंद पिंपळगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गांगुर्डे अधिक तपास करीत आहेत. अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यासाठी कायदा अस्तित्वात असतानाही अशा प्रकारे विवाह लावून दिल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, अल्पवयीन मुलीची ओळख उघड होईल अशी वैयक्तिक माहिती प्रसिद्ध करू नये, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बालविवाहासंदर्भातील कोणतीही माहिती मिळाल्यास ती तातडीने पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT