Girish Mahajan 
नाशिक

Minister Uday Samant | गिते बंधूंच्या माघारीसाठी महाजनांचा पुढाकार

Minister Uday Samant | मंत्री उदय सामंत : महायुती अभेद्य, राष्ट्रवादीच्या उमेदवारांशी पक्षश्रेष्ठींनी केली चर्चा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गिते बंधूंच्या माघारीसाठी मंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. गणेश गिते यांनी माध्यमांमध्ये मंत्री गिरीश महाजन जे सांगतील ते मी करणार, असे विधान केले होते. त्यामुळे गिते बंधूंच्या माघारीबाबत आम्ही निश्चिंत आहोत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ज्या उमेदवारांनी अर्ज केला, त्यांच्याशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चर्चा केली आहे. त्यामुळे निवडणुकीत महायुती अभेद्य आहे, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून झालेली बंडखोरी थोपविण्यासाठी बुधवारी (दि. ३) नाशिक मुक्कामी आलेल्या मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत, राज्यातील महायुतीच्या १७उमेदवारांच्या बाजूने मतदान करण्याचे आदेश दिले.

महायुतीतील घटक पक्ष आदेशाचे पालन करणारे असल्याने, ज्यांच्याकडून अनावधानाने अर्ज भरले गेले आहेत ते माघार घेतील याबाबत आम्हाला खात्री आहे. गिते बंधूंच्या माघारीसाठी मंत्री महाजन यांनी पुढाकार घेतला असून, दोन्ही बंधू माघार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याविषयी समन्वय समितीदेखील यादृष्टीने प्रयत्नशील आहे. आमदार सुहास कांदे नाराज असल्याची फक्त चर्चा होते. त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी बोलणे झाले असून, ते पूर्ण ताकदीनिशी सेना उमेदवाराच्या पाठीशी आहेत. यासाठी त्यांना कोणताही शब्द दिला नाही.

कारण ते शब्दावर काम करणारे नसून, परखड बोलणारे आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये कोणतीही बंडखोरी नसून, सर्व नेते आणि मित्रपक्ष एकमेकांशी पूर्ण समन्वयाने काम करत असल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार सुहास कांदे, किशोर दराडे, उपमहापौर विलास शिंदे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आदी उपस्थित होते.

कांदे आणि भुजबळ यांच्यात समन्वय स्थानिक पातळीवरील नाराजीवर बोलताना मंत्री सामंत यांनी आमदार सुहास कांदे यांचे उदाहरण दिले. सुहास कांदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. पक्षासाठी मी गरज पडल्यास भुजबळ यांच्याकडेही जाईन, असे कांदे यांनी स्पष्ट केले.

रोहित पवार, उबाठावर टीका आमदार रोहित पवार यांच्यावर टीका करताना सामंत म्हणाले की, त्यांच्या पद्धतीवर काही बोलण्याची गरज नाही, त्यांचा पराभव निश्चित आहे. उद्धवसेनेकडून केवळ नाटक सुरू असून, समाजात वेगळे वातावरण तयार करण्याचा हा वायफळ प्रयत्न आहे. घोडेबाजार असल्याने नाशिकमध्ये उमेदवार न देणाऱ्या उद्धवसेनेने इतरत्र उमेदवारी केली आहे. त्यामुळे त्यांचा दावा किती बालिश आहे हे सिद्ध होते, असेही सामंत म्हणाले.

पश्चात्ताप आम्हाला नव्हे उबाठाला होतोय

पश्चात्ताप करणारेच शिंदेसेनेत आले आहेत, अशी टीका करणाऱ्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. आमच्यावर पश्चात्ताप करायची वेळ आलेली नाही, उलट अशाच पत्रकार परिषदा आणि चुकीच्या भूमिकेमुळे त्यांचे गट पडले आहेत. शिंदेसेना हीच खरी शिवसेना असल्याचे मतदारांनीच त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आम्हाला मातोश्रीवर जाण्याची अजिबात गरज नाही, असे म्हणत मंत्री सामंत यांनी खासदार संजय राऊत यांना हा टोला लगावला. पश्चात्ताप व्यक्त करून मातोश्रीवर येण्याबद्दल राऊत सांगत आहेत, या आमंत्रणावर नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे यांच्याकडे बोट दाखवत तिकडे पश्चात्ताप झाल्याने शिंदेसेनेत अजूनही नेते येत आहेत, मात्र राऊत यांना ते कळत नसल्याचेही मंत्री सामंत म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT