चांदवड (नाशिक) : राज्यातील विरोधी पक्षांकडे एकही मुद्दा नसल्याने ते सत्ताधाऱ्यांवर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. राजीनामा मागणाऱ्यांना आम्ही यापूर्वीच गाडले आहे. दलालांचे ऐकून राजीनामा देऊ का? असा प्रतिप्रश्न करत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी एमआयएमचे माजी खासदार एम्तियाज जलील यांचा चांगलाच समाचार घेतला. मंत्री शिरसाठ यांनी सोमवारी (दि. 21) तालुक्यातील णमोकार तीर्थ येथील जैन धर्मगुरू महर्षी देवनदीजी महाराजांची भेट घेत आशीर्वाद घेतले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.
मंत्री शिरसाठ यांचा पैशांच्या बॅगसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या मंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. याबाबत शिरसाट यांना विचाले असता त्यांनी जलील यांचा चांगलाच समाचार घेतला. असे अनेक जलील आले आणि गेले. राजकारणातील दलालाचे ऐकून मी राजीनामा देऊ का? हे ब्लॅकमेलिंग करणारे लोक आहेत. त्यांच्याबाबत अधिक बोलणे योग्य नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. राज्य सरकारचा कारभार गुण्यागोविंदात सुरू आहे. तो विरोधकांना सहन होत नसल्याची टीका यावेळी मंत्री शिरसाठ यांनी केली. दरम्यान, शिवसेना शिंदे गट व अजित पवार गटातील मंत्र्यांना विरोधकांकडून टार्गेट केले जात असून, भाजपचे मंत्री टाळले जातात या प्रश्नाला मात्र, बगल देत शिरसाठ यांनी काढता पाय घेतला.
आपल्यावर आलेल्या संकटामुळे देवदर्शन घेताय का? या प्रश्नावर मंत्री शिरसाठ यांनी राजकारणात संकट येणारच. मी कोणत्याही संकटाला घाबरत नाही. विरोधकांना सरकारचा स्थिर कारभार सहन होत नसल्याने खोटे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले.