जळगाव : पुढारी वृत्तसेवा
शहरातील क्रीडा सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात येत असून, शहरातील स्टेडियम दुरुस्तीसाठी १७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सिंथेटिक ट्रॅक, लॉन व रंगरंगोटीची कामे पूर्ण झाली असून, आता २४० कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक क्रीडांगण उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. पोलिसांकडील मुद्देमाल सुपूर्द कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री महाजन म्हणाले की, स्टेडियम खेळाडू घडविण्याचे केंद्र आहे. मात्र, काही ठिकाणी क्रीडा साहित्य खराब अवस्थेत पडून असल्याच्या तक्रारी आहेत. क्रीडा खात्याची जबाबदारी मला आणखी दीड ते दोन वर्षे मिळाली असती, तर आणखी मोठे बदल घडवून आणता आले असते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
खडसेंच्या प्रवेशावर मिश्कील टिप्पणी
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत विचारले असता मंत्री महाजन यांनी मिश्कील उत्तर दिले. गेल्या वेळी माझ्यामुळे त्यांचा प्रवेश थांबला नव्हता. 'त्यांची थेट दिल्लीपर्यंत हॉटलाईन आहे, माझी तर मुंबईपर्यंतही नाही,' असा टोला त्यांनी लगावला. वरिष्ठ पातळीवरून ग्रीन सिग्नल मिळाला, तर माझी काहीच अडचण नाही. मी भविष्यवाणी करत नाही कारण मी संजय राऊत नाही, असे म्हणत त्यांनी राऊत यांनाही टोला लगावला.