नाशिक : शासन, सार्वजनिक, खासगी भागीदारी या त्रिसूत्रीनुसार विकास व्हावा असे सुचविणारे, पुढील २५ वर्षांचा रोड मॅप असलेले व्हिजन डॉक्युमेंट नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एनएमआरडीए)कडे 'मी नाशिककर'तर्फे सादर झाले.
नाशिकच्या शाश्वत व संतुलित विकासासाठी नाशिकचे ब्रॅण्डिंग करताना सिंहस्थ कनेक्ट टुरिझम प्लॅन राबविण्याचा निर्धार याद्वारे करण्यात आला असून, यातून एक लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
'एनएमआरडीए'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसाळ यांच्या सूचनेनुसार हे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात आले आहे. 'मी नाशिककर'चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोठेकर व 'आयआयएमए'चे सीएसओ कबीर सुभेदार यांनी या 77 पानी रोड मॅपचे सादरीकरण 'एनएमआरडीए'चे उपसंचालक दीपक वराडे व नियोजन अधिकारी दिव्यांक सोनवणे यांच्याकडे केले. नाशिकच्या भविष्यकालीन विकासासाठी एनएमआरडीए आवश्यक पायाभूत सुविधांसह योग्य नियोजन कसे करू शकते, याचा ऊहापोह या आराखड्यात करण्यात आला आहे.
नाशिकच्या विकासाचे व्हिजन, अंमलबजावणीचे टप्पे, प्रक्रिया, कृती, भागधारक योजना, नोकऱ्या, तयार पायाभूत सुविधा, पायाभूत सुविधांचे अपग्रेडेशन, भविष्यकालीन वाढ आदींचा समावेश या आराखड्यात करण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने, मी नाशिककरतर्फे सिंहस्थ कनेक्ट टुरिझम प्लॅन राबविण्यात येणार आहे. यात हवाई आणि रस्ते मार्गांच्या कनेक्टेड पॅकेजेससह पर्यटकांना नाशिकमधील जास्तीत जास्त पर्यटन व धार्मिक स्थळांना भेट देता येईल. या आराखड्याची अंमलबजावणी केल्यास एक लाख रोजगारनिर्मिती होईल. याद्वारे नाशिकचे जागतिक पातळीवरील रँकिंग सुधारेल.
नाशिक 3.0 अंतर्गत शाश्वत व संतुलित विकास घडविणे. यात इको ग्रीन आणि धार्मिक पर्यटन, वाइनरी आणि कृषी निर्यात, रिंग रोड कनेक्टिव्हिटी, एसटीपीआय आणि खासगी आयटी पार्क, आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पर्यटन, खासगी विद्यापीठे, रोजगारनिर्मिती, नाशिकचे ब्रॅण्डिंग आदी नाशिकच्या विकासाला चालना देणाऱ्या मुद्द्यांचा समावेश या आराखड्यात आहे.
एनएमआरडीए आणि जिल्हा विकास योजनेला पाठिंबा देण्यासाठी, विकसित भारत अंतर्गत मी नाशिककर नाशिक@२०३०, पीपीपी रोड मॅपअंतर्गत संपूर्ण भारतातील सल्लागार संघटनांसह नाशिकचे भारतभर ब्रॅण्डिंग करणार आहे. मोठ्या आयटी कंपन्या आणि आयटी इन्फा बिल्डिंग कंपन्यांना नाशिकमध्ये आमंत्रित करणे, फ्रेमर्ससह कृषी प्रक्रिया उद्योग उपक्रमांद्वारे नाशिकच्या कृषी निर्यात वाढीला चालना देणे. मोठे भूखंड राखीव ठेवण्यासाठी मदर इंडस्ट्रिजसाठी 'एमआयडीसी'शी लॉबिंग करण्याचे काम केले जाणार असल्याचे संजय कोठेकर यांनी सांगितले.