नाशिक : शेती, द्राक्षबागा, पांजरापोळची आमराई, चामरलेण्याजवळील वनसंपदेमुळे हिरवेगार म्हसरूळ नाशिक पूर्व विभागाची ऑक्सिजनची फॅक्टरी आहे. परंतु याच हिरव्यागार म्हसरूळला उदासीन नगरसेवक, मनपाच्या दुर्लक्षामुळे ग्रहण लागले आहे. म्हसरूळ परिसरातील रस्त्यांवर तसेच रस्त्यांलगत जागोजागी मातीचे ढीग, मोठमोठ्या टॉवरच्या बांधकामामुळे सिमेंटचे उडणारे कण, बांधकाम साहित्यांच्या दिवस-रात्र धावणाऱ्या गाड्यांतून उडणाऱ्या कणांमुळे म्हसरूळकरांची श्वासनलिका अक्षरश: कोंडली गेली आहे.
धुलीकणांच्या वाढत्या प्रमाणांमुळे श्वसनसंस्थेच्या आजारात झपाट्याने वाढ होत चालली आहे. संपूर्ण म्हसरूळ पट्टा यंदाच्या थंडीत खोकला आणि श्वसनाच्या विकारांनी त्रस्त झाला आहे. परिसरातील दवाखाने रुग्णांनी गच्च भरले आहेत. या परिसरात दमा, एम्फिसिमा, क्रॉनिक ब्राँकायटिस, इन्फ्लुएंझा, न्यूमोनिया, पल्मोनरी फायब्रोसिसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. आजच्या घडीला म्हसरूळला श्वसनविकाराचे किमान पाच हजार रुग्ण आहेत.
म्हसरूळला दिंडोरी रोडवरील म्हसरूळ नाका ते पंचवटी कारंजा, किशोर सूर्यवंशी मार्ग, मेरी रासबिहारी लिंक रोड, पेठ रोडवर पाटापासून राऊ हॉटेल ही चार ठिकाणे धुलीकणांचे हॉटस्पॉट ठरले आहेत. दिवसभर हवेत तरंगणाऱ्या धुलीकणांमुळे हवा धुरकट झाली आहे. धुलीकणांचा प्रमुख हॉटस्पॉट हा पेठ रोडवरील आरटीओ ऑफिस चौक हे ठिकाण ठरले आहे.
या चौकात पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडले होते. हे खड्डे बुजविण्यासाठी मनपाने चक्क दगड आणि माती टाकून त्यावर रोलर फिरवला. हीच माती गेल्या एक महिन्यांपासून हवेत पसरत आहे. त्यावरून अवजड वाहने जाताच अक्षरश: धुळीचे लोट हवेत उडत आहे. त्यामुळे आरटीओ ऑफिससमोरून जाताना दुचाकीस्वारांच्या नाकातोंडात धुलीकण जात आहेत. या धुळवडीमुळे नागरिकांना श्वसनाचे विकार जडले आहेत.
विशेषत: याच भागाच बाजार समिती आहे. दर तासाला जिल्ह्यातून भाजीपाला तसेच देशभरातून विविध प्रकारचे धान्य, किराणा मालाच्या किमान 20 ते 25 ट्रक, टेम्पो येतात. गुजरातला औद्योगिक उत्पादनांची वाहतूक करणाऱ्या मालट्रक पेठ रोडवरून सुरू असते. परिणामी, या भागातील एक्यूआय दिवसभर 200 च्या पुढे असतो. नाशिकचा एक्यूआय सरासरी 130 ते 170 च्या दरम्यान सध्या नोंदविला जात असला तरी पेठ रोडवरील एक्यूआय मोबाइल ॲपवर प्रत्यक्षात 250 च्या आसपास दिसत आहे. ही हवा आरोग्यासाठी अतिशय अयोग्य आहे. विशेषत: रुग्ण, दमा, लहान बाळ, गर्भवती महिला यांच्यासाठी ही हवा तर विषासमान आहे.
पेठ रोड हा दुचाकीस्वारांसाठी आता विषारी मार्ग ठरला आहे. या रस्त्यावरून उडणारा धुरळा परिसरातील बिल्डिंग, सोसायट्यांमध्ये जात आहे. विशेषत: याच भागात अनेक मोठी रुग्णालये, दवाखाने आहेत. ही हवा तेथील रुग्णांसाठी धोकादायक ठरली आहे. याच भागात अनेक मोठे कॉम्प्लेक्स, शाळा, महाविद्यालय आणि निवासी इमारतींची उभारणी सुरू आहे.
पेठ रोडलगत आजच्या घडीला छोटे-मोठे मिळून 900 इमारतींची उभारणी सुरू आहे. परंतु बांधकामाच्या वेळी याच भागात सिमेंटचे कण हवेत मिसळण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की, दुपारी अकरा-बाराला हवा अक्षरश: धुरकट दिसते. त्याचबरोबर रस्त्यावरून उडणाऱ्या धुलीकणांमुळे एक्यूआय थेट 150 टक्क्याने वाढतो.
पेठ रोडवर बाजार समितीच्या परिसरात दोन चौक आहेत. यातील पहिला चौक हा तारवालानगरकडून येणाऱ्या रस्त्याचा आहे. या रस्त्यावरून दिवस-रात्र गुजरातला मोठ्या प्रमाणात मालवाहतूक सुरू असते. दिवसभरात या भागातून सरासरी सहा हजार ट्रक, दोन हजार बस, दीड हजार रिक्षा आणि सुमारे वीस हजार दुचाकींची ये-जा सुरू असते. सकाळी दहा ते रात्री आठ या काळात येथील एक्यूआय हा चक्क तीनशेच्या पुढे जातो. याला कारण म्हणजे या वाहनातून सतत बाहेर पडणारा धूर आणि मनपाने खड्ड्यात ओतलेली माती म्हसरूळकरांच्या जीवावर उठली आहे.
ठेकेदारांची चांदी, नागरिकांचे मरण
नाशिक मनपाचे अधिकारी तसेच ठेकेदारांनी पावसाळा संपल्यानंतर खड्डे बुजविताना चक्क माती आणि खडीचा वापर करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला आहे. या खेळात मनपा अधिकारी आणि ठेकेदारांनी कोटवधी रुपये कमवले. परंतु म्हसरूळच्या नागरिकांना धुळीमुळे श्वसनाचे विकार जडले आहेत आणि त्यासाठी म्हसरूळ पट्ट्यातील नागरिकांचे दरमहा किमान आठ लाख रुपये खर्च होत आहे.
निवडणुकीच्या धुरळ्यात विरले प्रदूषण
नुकत्याच पार पडलेल्या मनपा निवडणुकीत रस्त्यांचा मुद्दा कोणत्याही उमेदवाराने मांडला नाही. रस्त्यांवर खड्ड्यात टाकण्यात येणाऱ्या खडी आणि मातीबद्दल चकार शब्दही काढला नाही. नागरी समस्यांचा मुद्दा निवडणुकीपूर्वी अनेक मोर्चातून बाहेर आला असताना त्याकडे उमेदवारांनी साफ दुर्लक्ष केले आहे. हे दुर्लक्षच आता नागरिकांच्या जीवावर उठले आहे.
सकाळी फिरणाऱ्यांना इशारा
सध्या थंडीत म्हसरूळ, मखमलाबाद परिसरात धुके पडत आहे. धुके आणि प्रदूषणयुक्त हवा ही फुफ्फुसासाठी अतिशय घातक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. धुक्यामुळे हवा जड होऊन धुलीकण, सिमेंटचे कण हवेत तरंगत राहतात आणि थेट फुफ्फुसात गेल्याने फुफ्फुसाचा दाह वाढवतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे धुके दूर झाल्यानंतर विशेषत: सकाळी सातच्या सुमारास सध्या मॉर्निंग वॉक करणे योग्य असल्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
सिमेंट कणांचे दुष्परिणाम
1) दीर्घकाळ या धुळीचा श्वास घेतल्याने अस्थमा, ब्राँकायटिस, श्वसननलिकेतील दाह, फुफ्फुसांचा तंतुमय रोग निर्माण होतो.
2) सिमेंटमध्ये कॅल्शियम ऑक्साइड, सिलिका, अल्युमिना, क्रोमियमसारखी रसायने असतात. दीर्घकाळ यांचा संपर्क आल्यास हाडे व सांधे कमजोर होणे, यकृत व मूत्रपिंडांवर ताण, कर्करोगाचा धोका वाढतो.