नाशिक

MHADA Flat Scam | म्हाडा सदनिका घोटाळा; भूमिअभिलेखचे नऊ जण निलंबित

नगररचनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतला धसका

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा सदनिका घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. चौकशीचा फास आता विविध शासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. महसूल विभागातील मंडळ अधिकाऱ्यासह तीन तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता भूमिअभिलेख विभागातील नऊ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. म्हाडा प्रकल्पांशी संबंधित कामकाज हाताळलेल्या नगररचना विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.

विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी चौकशी सुरू आहे. एक एकरपेक्षा अधिक क्षेत्रावरील गृहप्रकल्पांत आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या म्हाडाच्या सदनिकांची तरतूद करण्याच्या नियमांचा कथित गैरवापर झाला का, याची तपासणी केली जात आहे. काही प्रकल्पांचे क्षेत्रफळ कागदोपत्री कमी दाखवून म्हाडाला देय असलेल्या सदनिकांची संख्या कमी करण्यात आली का, याचीही पडताळणी सुरू आहे. जमिनीचे क्षेत्रफळ, हद्द, मोजणी, नकाशे, फेरफार आणि अन्य अभिलेख महत्त्वाचे ठरत असल्याने तपास भूमिअभिलेख विभागापर्यंत पोहोचला आहे.

मनोज शिवदे, प्रशांत अडांगळे, सोमकांत जैन, दीपक गांगुर्डे, नरेश कांबळे, राजेश वाडकर, सोमनाथ सानप, नीलेश कापसे आणि चंद्रकांत घोडेले या नऊ जणांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. यात शिरस्तेदार, भूमापक पर्यवेक्षक, भूमापक, प्रतिलिपी लिपिक आणि दप्तरबंद यांचा समावेश आहे. दरम्यान, निलंबन ही चौकशीदरम्यानची प्रशासकीय कारवाई असून, त्यातून संबंधितांचा गैरप्रकारातील सहभाग सिद्ध झाल्याचा निष्कर्ष काढता येत नाही. त्यामुळे एसआयटीच्या सविस्तर चौकशीनंतरच प्रत्येकाची नेमकी जबाबदारी स्पष्ट होणार आहे.

मोजणीपासून ले-आउटपर्यंत तपास

एखाद्या प्रकल्पाचे क्षेत्रफळ, जमिनीचा वापर, मंजूर आराखडा आणि प्रत्यक्ष बांधकाम यातील तफावत तपासली जात आहे. जमिनीची मोजणी कशी झाली, कोणत्या अभिलेखाच्या आधारे क्षेत्रफळ निश्चित झाले, फेरफार नोंदी कशा झाल्या आणि त्यानंतर नगररचना विभागाने कोणत्या आधारे आराखडे मंजूर केले, यावर एसआयटीचा भर राहणार आहे.

नगररचनातील फाइल्सवर नजर

महसूल आणि भूमिअभिलेख विभागातील कारवाईनंतर आता नगररचना विभागातील जुन्या फाइल्स तपासल्या जाणार आहेत. महसूल अभिलेखातील क्षेत्रफळ, भूमिअभिलेखाची मोजणी, नगररचनेचा मंजूर आराखडा आणि प्रत्यक्ष बांधकामात तफावत आहे का, याची पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT