नाशिक : नाशिक शल्यचिकित्सक संस्थेच्या वार्षिक परिषद उद्घाटन सोहळ्यात बोलतान मंत्री छगन भुजबळ. व्यासपीठावर परिषदेचे पदाधिकारी. 
नाशिक

Medical Tourism Hub Nashik : नाशिक मेडिकल टुरिझम हब करण्यास प्राधान्य

मंत्री छगन भुजबळ : शल्यचिकित्सक संस्थेची वार्षिक परिषद

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक जिल्हा हा शिक्षण, शेती, उद्योग, पर्यटन क्षेत्रात अग्रेसर आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रातदेखील जिल्हा दिवसेंदिवस प्रगती करत आहे. नाशिकमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ट्रॉमा सेंटर, नविन वैद्यकीय महाविद्यालये आणि ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे हळूहळू सक्षम केली जात आहेत. यामध्ये शल्यचिकित्सकांचा सहभाग महत्त्वाचा असून, नाशिक हे मेडिकल टुरिझम हब म्हणून विकसित करण्यास प्राधान्य असेल, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक शल्यचिकित्सक संस्थेच्या वार्षिक परिषद उद्घाटन सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री भुजबळ बोलत होते. असोसिएशन ॲाफ सर्जन्स ॲाफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. प्रविण सुर्यवंशी, महाराष्ट्र स्टेट सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. महेश मालु, माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद शिंदे, नाशिक सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नागेश मदनूरकर, सेक्रेटरी डॉ. अमित केले, डॉ. कैलास कमोद, डॉ. सुधाकर जाधव आदी उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले, राज्य शासनाने आरोग्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यातील गोरगरीब जनतेला उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी शासन अनेक उपक्रम राबवित आहे. या सर्व उपक्रमांच्या अंमलबजावणीत शल्यचिकित्सकांचा सहभाग जितका जास्त असेल, तितकेच हे उपक्रम यशस्वी होऊ शकेल. वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्याने याचा प्रचार प्रसार होण्यासाठी अशा परिषदा नियमित होणे आवश्यक आहे. एक शल्यचिकित्सक ऑपरेशन थिएटरमध्ये असतो तेव्हा तो केवळ औषधांचा उपयोग करीत नसतो, तर तो विज्ञान, अनुभव आणि धैर्य यांचा संगम साकारत असतो. समाजाच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करताना शल्यचिकित्सकांची भूमिका मोलाची असून, शल्यचिकित्सक हा समाजातला जबाबदार व्यक्तींपैकी एक असल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. संजीव देसाई, डॉ. नंदकिशोर कातोरे, डॉ. अमित केले, डॉ. पराग धामणे, डॉ. प्रशांत मुठाळ, डॉ. जी. बी. सिंग, डॉ. कैलास मोगल आदी उपस्थित होते. प्रस्ताविक डॉ. नागेश मदनूरकर यांनी केले.

शल्यचिकित्सकांना आवश्यक मदत

समृध्दी महामार्गावर शल्यचिकित्सक सोसायटीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना आवश्यक ती मदत शासन स्तरावरून उपलब्ध करून देईल, असे आश्वासन मंत्री भुजबळ यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT