नाशिक

माध्यमांनी लेखणीची धार कायम ठेवावी : मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सामाजिक स्तरावर राजकारण, समाजकारण, माध्यमे आदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. या बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानाला धरून पत्रकारितेच्या क्षेत्रातही मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. साधने जरी बदलली असली तरी पत्रकारितेमधील साध्य बदलले नाही. माध्यमांंनी आपल्या लेखणीची धार कायम ठेवावी. तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना प्रत्येक घटनेची माहिती एका क्षणात कानाकोपऱ्यात पोहोचते, असे प्रतिपादन राज्याचे महसूल व दुग्धविकासमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

शहर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त गौरव समारंभाचे आयोजन केले होते. सोमवारी (दि. ८) मविप्रच्या केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या या पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी दैनिक 'पुढारी'चे शहर प्रतिनिधी वैभव कातकाडे यांच्यासह विविध वृत्तसंस्थांमधील प्रतिनिधींनाही सन्मानित करण्यात आले. डॉ. विखे-पाटील म्हणाले की, पत्रकारिता क्षेत्रापुढे सद्यस्थितीत विश्वासार्हतेचे मोठे आव्हान आहे. लेखणीची ताकद नाकारता येणार नाही. परंतु फेक न्यूजचे वाढणारे प्रमाण पत्रकारिता क्षेत्राला मारक ठरत आहे. त्यामुळे जबाबदार माध्यम म्हणून विषयानुरूप उद्याच्या संक्रमणाच्या काळात पुढे जावे. बदल स्वीकारून लेखणीची धार कमी न करता वास्तविक पत्रकारिता करावी.

एक विशिष्ट वर्ग अद्यापही सोशल मीडियावरील बातम्यांपेक्षा वर्तमानपत्रांवर विश्वास ठेवून आहे. वाचकांचा विश्वास टिकून असलेले हे वृत्तपत्र कोरोनानंतर पुन्हा उभारी घेत आहेत. नाशिकला पत्रकारितेचा मोठा इतिहास आहे. दादासाहेब पोतनीसांसारख्या हाडाच्या पत्रकारांनी समृद्ध पिढी घडविण्याचे काम केल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. सोहळ्यासाठी मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे संचालक अजिंक्य वाघ, ज्येष्ठ पत्रकार राहुल रनाळकर, हेमंत भोसले, चंदुलाल शाह, जयप्रकाश पवार, मिलिंद कुलकर्णी, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष संपत देवगिरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT