Gondhal Marathi Film Oscar 2027 Pudhari
नाशिक

Marathi Movie Oscar | सिन्नरच्या भोकणी गावातील 'गोंधळ' थेट ऑस्करच्या शर्यतीत; 2027 च्या ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका!

Marathi Movie Oscar |भूमिपुत्र संतोष डावखर यांच्या लेखन-दिग्दर्शनाची आंतरराष्ट्रीय झेप | 2027 ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील भोकणीच्या मातीत रुजलेली लोकपरंपरा आता जागतिक चित्रपट विश्वाच्या केंद्रस्थानी पोहोचली आहे. भोकणीचे भूमिपुत्र संतोष सोपान डावखर यांच्या लेखन-दिग्दर्शनाखाली साकारलेल्या 'गोंधळ' या मराठी चित्रपटाची २०२७ च्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली. त्यामुळे ग्रामीण सिन्नरच्या कलाविश्वाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले आहे.

ग्रामीण महाराष्ट्रातील गोंधळ, जागरण, श्रद्धा आणि लोकजीवनाचा वेध घेणाऱ्या या चित्रपटासाठी पारंपरिक विधींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी भोकणी येथे डावखर यांच्या घरासमोरच 'गोंधळ'ची रंगीत तालीम घेण्यात आली होती.

यावेळी खासदार राजाभाऊ वाजे आणि भोकणीचे सरपंच अरुण वाघ उपस्थित होते. संतोष डावखर यांचे वडील सोपान डावखर यांनी ही माहिती दिली. चित्रपटाला पद्मविभूषण इलायराजा यांचे संगीत लाभलेले असून, पार्श्वसंगीतही त्यांचे योगदान आहे.

अंगणातील रंगीत तालीम ते ऑस्करसाठी निवड

सिन्नर तालुक्यातील भोकणीसारख्या ग्रामीण गावातून चित्रपटसृष्टीत वाटचाल करणाऱ्या संतोष डावखर यांनी आपल्या लेखन-दिग्दर्शनातून स्थानिक लोकपरंपरेला व्यापक अवकाश मिळवून दिला. ज्या भोकणीच्या अंगणात 'गोंधळ'ची रंगीत तालीम झाली,

त्याच कलाकृतीने आता ऑस्करच्या शर्यतीसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका होण्याचा मान मिळविला आहे. त्यामुळे सिन्नरच्या ग्रामीण कलाविश्वासाठी हा क्षण विशेष अभिमानाचा ठरला आहे. लोकपरंपरेतील श्रद्धा, विधी आणि ग्रामीण जीवनाचे पदर वास्तवदर्शी पद्धतीने रूपेरी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न 'गोंधळ'मधून करण्यात आला आहे.

दिग्दर्शक राजीव पाटील ते संतोष डावखर

तालुक्यातील मनेगावचे भूमिपुत्र असलेले राजीव पाटील यांनी यापूर्वी मराठी सिनेसृष्टीत दिग्दर्शनाच्या माध्यमातून मोहोर उमटविली होती. 'जोगवा'सारखा त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नावाजलेला आणि मैलाचा दगड म्हणून ओळखला जातो. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यानंतर आता संतोष डावखर यांच्या निमित्ताने हा वारसा सिन्नर तालुक्यातील आणखी एका भूमिपुत्राने जपल्याचे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT