नाशिक : राज्यभर गाजलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणावर आधारित मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची चर्चा रंगली आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद या महत्त्वपूर्ण राजकीय भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत दीपाली सय्यद यांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्या रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणार का, याबाबत चर्चा आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटात अशोक खरात याच्यावर झालेल्या गंभीर आरोपांपासून ते या प्रकरणामागील कथित राजकीय आणि सामाजिक पैलूंवर प्रकाश टाकला जाणार आहे. महिलांची लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात याच्याविरोधात विविध ठिकाणी एकूण १९ गुन्हे दाखल असून, १८ मार्चपासून तो कारागृहात आहे.
नाशिक शहर पोलिसांचे विशेष तपास पथक, अहिल्यानगर पोलिस, नाशिक ग्रामीण पोलिस तसेच अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्याकडून विविध स्तरांवर या प्रकरणाचा तपास करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्वच माध्यमांमध्ये या प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असल्याने आता या कथानकावर चित्रपटाची निर्मिती होण्याची शक्यता आहे.