Politics within the institute heated up over the issue of MVIPR's private university
नाशिक : मविप्र संस्थेच्या निवडणुकीस अजून दोन वर्षे असली तरी खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून संस्थेतील राजकारण तापले आहे. विद्यमान सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे आणि अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले आमनेसामने आल्याने, ढिकले हे सरचिटणीसपदाचे दावेदार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सरचिटणीसपदासाठी नीलिमा पवार आणि ठाकरे यांच्यातील पारंपारिक लढाईत आता ढिकले यांचीही एन्ट्री झाल्याने, आगामी निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
मविप्र संस्थेची निवडणूक होऊन तीन वर्षांचा कालावधी झाला आहे. साधारणपणे निवडणूक वर्षात रंगणारे वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप, यंदा खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून लवकरच पेटले असून त्यातून संस्थांतर्गत राजकारण ढवळून निघाले आहे. अॅड. ठाकरे यांच्या मविप्र खासगी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णयास डाॅ. ढिकले यांनी पत्राद्वारे खुला विरोध दर्शविला. त्यावरून उभयतांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. ढिकले यांना सरचिटणीसपदाचे वेध लागल्यानेच ते विरोधाला विरोध करत असल्याचा घणाघात अॅड. ठाकरेंनी केला. तर, अॅड. ठाकरेंना सत्तेची लालसा झाली असून हुकुमशाही पध्दतीने कामकाज करावयाचे असल्याने खासगी विद्यापीठाचा हट्ट धरत असल्याची टीका ढिकलेंनी केली आहे.
रविवारी (दि. १४) संस्थेची सर्वसाधारण सभा होत असून यातही या मुद्दा तापविण्याची तयारी दोघांकडून सुरू झाली आहे. माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांना मुद्याचे आयते कोलित मिळाल्याने त्यांही याविरोधात सभासदांमध्ये उतरल्या आहेत. तिघांकडूनही व्हीडीओ वाॅर सुरू झाल्याचे बघावयास मिळत आहे. संस्थेच्या कार्यकारिणीत सहा पदाधिकारी आणि 16 संचालक असले तरी, सरचिटणीस हे पद सर्वेसर्वा आहे. पॅनलची सर्व मदार याच पदावर असते. गत दहा वर्षांपासून सरचिटणीसपदासाठी थेट पवार विरूध्द ठाकरे असा सामना रंगत होता. परंतू, ढिकले यांच्या आक्रमक पवित्र्याने तेही सरचिटणीसपदाच्या स्पर्धेत आल्याने यापदासाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. निवडणुकीस, दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे अनेक राजकीय उलथापालथी होऊ शकतात. परंतू, यात सभासदांपुढे सरचिटणीसपदासाठी नवीन चेहरा समोर आला आहे, असे म्हटले तर, फारसे वावगे ठरणार नाही !