नाशिक : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत 29 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या आंदोलनास नाशिक जिल्ह्यातून पाच लाख मराठा बांधव दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा करून मुुंबईकडे कूच करतील, अशी माहिती छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिली.
नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका माता मंदिर परिसरात शनिवार (दि. 23) नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत 29 ऑगस्ट रोजी मुंबईत होणार्या आंदोलनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.
गायकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारला अंतिम निर्वाणीचा इशारा दिला आहे. सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. सरकारने चालढकल केल्यास महाराष्ट्रातील मराठा समाजाची ताकद सरकारला परवडणारी ठरणार नाही. मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आंदाेलनास जिल्ह्यातील पाच लाख मराठा बांधव वाहनाने किंवा रेल्वेने मुंबईत दाखल होतील. नाशिक शहर, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव, नांदगाव, येवला आणि चांदवड तालुक्यांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मागील आंदोलनाप्रमाणेच आंदोलनास आर्थिक रसद व जेवणाची जबाबदारी उचलणार, असा ठराव यावेळी पारित करण्यात आला.
या बैठकीला करण गायकर, नानासाहेब बच्छाव, विलास पांगरकर, अण्णासाहेब पाटील, नितीन सुगंधी, विठ्ठलराजे उगले, बंटी भागवत, प्रफुल वाघ, राम खुर्दळ, योगेश कापसे अॅड. आनंदराव जगताप, अॅड. स्वप्निल राऊत, संपतराव वक्ते, प्रवीण कदम, प्रसाद फापाळे, विलास गडाख, दीपक हांडगे, विजय जाधव, रेखा जाधव, रोहिणी उखाडे, नवनाथ शिंदे डॉ किरण डोके, दीपक भदाणे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक शहरातून 29 तारखेला सकाळी सात वाजता, नाशिक शहर तसेच ग्रामीण भागातील सर्व समाजबांधव ग्रामदैवत श्री कालिका मातेचे दर्शन घेऊन मुंबईकडे प्रस्थान करतील. आंदोलन ऐतिहासिक ठरेल, असा ठाम विश्वास नाशिक जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांनी व्यक्त केला.