मनमाड : शहरातून जाणाऱ्या पुणे- इंदूर आणि नाशिक-जळगाव महामार्गांवरील वाहतूक कोंडी आणि नांदगाव शहरातील वाहतूक समस्येबाबत आमदार सुहास कांदे यांनी थेट विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी मांडत प्रश्नाला वाचा फोडली. आ. कांदे यांनी मनमाड, नांदगाव या दोन्ही शहराची ट्रॅफिक जॅममधून सुटकेसाठी उड्डाण पूल आणि बाह्य वळण रस्त्यांची मागणी केली. याबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. याबाबत दै. 'पुढारी'ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करत प्रश्नाला वाचा फोडली होती.
मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे- इंदूर, नाशिक- जळगाव आणि नांदगाव शहरातून नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्ग जातो. या तिन्ही मार्गांवरून रोज हजारो वाहनांची ये-जा असते. मात्र, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसणारी मोकाट जनावरे, रस्त्यावर नादुरुस्त उभी केलेली वाहने, बेशिस्त वाहनचालक यामुळे महामार्गावर रोज तासनतास वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्याचा त्रास वाहनधारकासोबतच नागरिकांनाही होत आहे.
याबाबत 'पुढारी'ने 4 जुलै रोजी 'वाहतुकीचा ताण' या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध करत समस्याला वाचा फोडली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि.11) आ. कांदे यांनी याबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले. आ. कांदे यांनी मनमाड शहर दीड लाख लोकसंख्येचे आहे. येथून जाणारे तिन्ही महामार्ग व रस्त्यावर असलेल्या मालेगाव चौफुलीवर वाहतुकीची रोज कोंडी असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
शहरात ऑइल कंपन्या, एफसीआयमधून रोज शेकडो वाहने जातात. या मार्गावर असलेला पूलही कमकुवत झाला आहे. या मार्गावर चार वर्षांत अपघातात सुमारे 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या महामार्गावर उड्डाण पूल बांधणे किंवा बाह्य वळण रस्ता द्यावा अशी मागणी केली.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मालेगाव, मनमाड, कोपरगावदरम्यान खासगीकरणातून रस्ता तयार करण्यात आला होता. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांकडून टोल घेतला जात होता मात्र, त्याची मुदत डिसेंबर 2025 रोजी संपत आहे. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत काम सुरू केले जाणार आहे. यामुळे मनमाड आणि नांदगाव या दोन्ही शहरांची समस्या तातडीने सोडवली जाईल, असे अश्वासन आमदार कांदे यांना दिले.