मनमाड (नाशिक) : शहराजवळील अनकवाडे शिवारात बारामती-पाचोरा बसला शुक्रवारी (दि. १९) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अपघात झाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ही बस रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात उतरली, मात्र सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. आपत्कालीन दरवाजातून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या बसमधून प्रवाशांना रवाना करण्यात आले.
बारामतीहून पाचोराकडे एम.एच. 14 एम. एच. 8593 क्रमांकाची बस जात होती. अनकवाडे शिवारात चालकाने पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे नियंत्रण सुटून बस रस्त्यावरुन खाली उतरली आणि खड्ड्यात उतरली. या अनपेक्षित प्रकाराने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. भीमा शिंदे यांसह इतर गावकऱ्यांनी बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढले. कुणालाही गंभीर इजा झालेली नसल्याने त्यांना सुखरूप दुसऱ्या बसमध्ये बसवून पुढील प्रवासाला रवाना केले.
मनमाड शहरातून जाणारा इंदूर-पुणे महामार्ग सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे. या रस्त्याची देखभाल एमएमकेआयपीएल या टोल कंपनीकडे आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी आव्हानात्मक ठरत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी साईडपट्ट्यांचा अभाव असल्याने अपघातांचीदेखील संख्या वाढली आहे. प्रवासी वर्गाने सार्वजनिक बांधकाम विभाग व टोल कंपनीकडे खड्डे तातडीने बुजवावेत आणि साईडपट्ट्या दुरुस्त कराव्यात, अशी मागणी केली आहे.