

मनमाड (नाशिक) : शहराला वागदर्डी धरणातून पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी शुक्रवारी (दि. १९) सकाळी फुटली. एका ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट जलवाहिनीवर आदळल्याने ही घटना घडली. परिणामी, मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. ही घटना शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर घडली. यामुळे मनमाडचा पाणीपुरवठा बाधित झाला आहे.
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. मात्र, जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. आधीच आठवड्यातून एकदाच पाणी मिळणाऱ्या शहराला आता आणखी उशिरा पाणी मिळण्याची शक्यता आहे. पालिकेकडून नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.