मनमाड : शहरापासून जवळ ग्रामीण भागात दरोडेखोरांच्या टोळक्याने मध्यरात्री हत्यारे घेऊन धुमाकूळ घातला. दरोडेखोरांनी पाच घरांतील लोकांना मारहाण केल्याने ते जखमी झाले आहेत. यात एका वृद्धेचा समावेश आहे. रोख रकमेसह दागिन्यांची लूट केली. सर्व जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मनमाडपासून सात किलोमीटरवरील सटाणे, कही भागात सात ते आठ दरोडेखोरांनी सर्वप्रथम साईनाथ दराडे यांच्या घराचा दरवाजा तोडत लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्यांनी साईनाथ दराडे आणि अरुणा दराडे यांना मारहाण केली. त्यांनी भांडी फेकत चोरट्यांचा प्रतिकार केला. पाच मिनिटे हा संघर्ष सुरू होता. कुटुंबाचा प्रतिकार पाहून चोरट्यांनी पळ काढला. त्यानंतर सटाणा भागातील लहिरे वस्तीला लक्ष्य केले.
अमोल व ज्योती लहिरे यांनी दरवाजा आतून रोखून धरल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. तेथून पळालेल्या चोरट्यांनी पवार वस्तीवरील कुसुमबाई पवार यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने हिसकावले. विरोध करणाऱ्या कुटुंबीयांना मारहाण करत मोबाइलची तोडफोड केली. या हल्ल्यात दिलीप पवार गंभीर जखमी झाले.
त्यानंतर चोरट्यांनी मोरे वस्तीवरील शिवाजी मोरे यांना मारहाण केली. मध्यस्थी करणाऱ्या रंजनाबाई मोरे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने त्यांना ४० टाके पडले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे-जखमींवर मालेगाव आणि नाशिक येथे उपचार सुरू आहेत.
जखमींची नावे अशी
दरोडेखोरांच्या हल्ल्यात साईनाथ दराडे, अरुणा दराडे, आशाबाई पवार, दिलीप पवार, शिवाजी मोरे, रंजनाबाई मोरे हे जखमी झाले आहेत. यातील रंजनाबाई मोरे यांची प्रकृती चिंताजनक आहे.