मालेगाव : प्रमोद सावंत
मध्य रेल्वेने मनमाड-इंदूर नवीन रेल्वेमार्ग (३०९.४३ किमी) प्रकल्पात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. हवाई भू-भौतिकीय सर्वेक्षणासाठी ई-निविदा जाहीर केली आहे. या सर्वेक्षणामध्ये चुंबकीय इमेजिंग व व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे जमिनीची सखोल रचना तपासली जाणार आहे. ज्यामुळे बांधकाम प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा आहे. अशातच मालेगाव व नांदगाव तालुक्यातील भूसंपादित क्षेत्रासाठी ८ डिसेंबरपासून भूमिअभिलेख विभागातर्फे प्रत्यक्ष जमीन मोजणी सुरू होणार आहे.
रेल्वेनेभू-भौतिकीयसर्वेक्षणाचीनिविदा (क्रमांक डीवासीई/सीओएन/बीएसएल /०६/२०२५) २१ नोव्हेंबरला प्रसिद्ध झाली आहे. निविदेचे अंदाजित मूल्य ७७.१६ लाखांहून अधिक आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण करण्याची मुदत आहे. निविदा दाखल करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर असून, त्याच दिवशी ऑनलाइन बोली उघडली जाईल.
मनमाड ते इंदूरदरम्यान जेवढे जमीन अधिग्रहण करायचे आहे, त्या संदर्भात निविदेत काम करणारी कंपनी जिओ-टॅगच्या माध्यमातून जमिनीची योग्य मोजणी करेल. यासाठी ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने जमिनीची खोदकाम तपासणी, लांबी रुंदीची मोजणी तसेच भू-संरचना परीक्षण केले जाईल. जमीन अधिग्रहणात कुठलीही चूक होऊ नये यासाठी मागितलेली जमीन आणि प्रत्यक्ष भूभागाचा जिओ-टेक डेटा जुळणे आवश्यक आहे. त्याकरिता ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण होईल. जमिनीवर ट्रॅक्टर आणि जेसीबीचा वापर केला जाईल. त्यामुळे प्रत्यक्ष भूमीस्तरावरही मनमाड-इंदूर प्रकल्पाचे काम आता सुरू होण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे.
प्रारंभी हा रेल्वेमार्ग तोट्याचा असल्याचे कारण देत सातत्याने लांबविला जात होता. मात्र, हा रेल्वेमार्ग माल व प्रवासी वाहतुकीला गती देईल. पूर्व व पश्चिम भारतातील संपर्क अधिक बळकट करेल. या मागनि राजधानीचे येथून अंतरही कमी होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर व्यापार, पर्यटन आणि औद्योगिक विकासालाही नवी चालना मिळेल. या प्रकल्पाच्या कामाच्या उर्वरित प्रक्रियाही लवकर पूर्ण व्हाव्यात, ज्यामुळे या बहुप्रतीक्षित रेल्वेमार्गाचे स्वप्न लवकर सत्यात उतरेल, अशी आशा आहे.
मालेगाव तालुक्यातील १५ व नांदगाव तालुक्यातील ६ अशा २१ गावांच्या मोजणीच्या नोटीस भूमिअभिलेखने रेल्वे प्रकल्पाचे काम पाहणाऱ्या स्थानिक महसूल अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्या आहेत. संबंधित विभागातर्फे तलाठ्यांमार्फत या नोटीससंबंधी भूखंड मालकांना बजावण्यात येतील. ८ डिसेंबरपासून प्रत्यक्ष मोजणी सुरू होईल. एकाच दिवसात साधारणतः सहा गट मोजणी होतात. त्यानुसार डिसेंबरअखेर हे काम संपुष्टात येईल. मोजणी शीट तयार करून अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होईल.रवींद्र भारदे, उपजिल्हाधिकारी, वैतरणा जलविद्युत प्रकल्प तथा मनमाड इंदूर न्यू लाइन सक्षम प्राधिकरण अधिकारी
भू-भौतिकीय सर्वेक्षण निविदा ही अत्यंत आनंदाची आणि समाधानकारक बातमी आहे. संघर्ष समितीने बराच काळ प्रलंबित असलेले हे महत्त्वाचे सर्वेक्षणाचे टेंडर जाहीर होणे हा प्रकल्पासाठी अत्यंत सकारात्मक संकेत आहे. हा जनतेच्या संघर्षाचा विजय आहे.मनोज मराठे, रेल्वे संघर्ष समिती