500 Encroachments Removed on Fourth Day of Manmad Drive
मनमाड : पुढारी वृत्तसेवा
शहरात पालिका प्रशासन, पोलिस, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तरीत्या सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम गुरुवारी (दि. ४) सलग चौथ्या दिवशीही सुरू होती. चार दिवसांत शहरातून जाणारे पुणे - इंदूर आणि नाशिक जळगाव या महामार्गांसह शहरातील वेगवेगळ्या भागांत ही मोहीम राबवून ५०० हून अधिक अतिक्रमणे उद्ध्वस्त करण्यात आली.
एकीकडे मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे हटविण्यात आल्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि महामार्ग परिसर मोकळा झाल्यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. दुसरीकडे अतिक्रमणे हटविण्यात आल्यामुळे ५०० कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अतिक्रमणे काढताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोपही होत आहे. धनदांडग्यांकडे कानाडोळा, तर गोरगरिबांवर अन्याय होत असल्याचा आरोप होत आहे. मात्र, अतिक्रमणे काढताना कोणताही भेदभाव केला जात नसून, आरोप बिनबुडाचे असल्याचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी सांगितले.
जळगाव शहराच्या मध्य भागातून पुणे इंदूर आणि नाशिक महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून वाहनांची संख्या वाढली. त्यात अवजड वाहनाची संख्या जास्त असून, अरुंद रस्ता आणि जादा वाहने असल्यामुळे दोन्ही महामार्गावर रोज तासन्तास वाहतूक कोंडी होत होती. दोन्ही महामार्गाजवळील दुकाने आणि इतर अतिक्रमणे कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत होते. नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अतिक्रमण काढण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार नगर परिषद प्रशासनाने वाहतुकीसाठी अडथळा ठरणारे अतिक्रमणधारकांना नोटिसा दिल्या होत्या. त्यानंतर सोमवारपासून पोलिस बंदोबस्तात नगिना मस्जिद समोर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली.
गेल्या चार दिवसांत नांदगाव रोड, चांदवड रोड, चौफुली, रेल्वे पूल परिसर, स्टेशन रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, तुफान चौक, श्रीराम चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. स्टेशन रोडपासून शहरातील प्रमुख मार्गावर एकाच वेळी मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे अनेक वर्षांपासून अतिक्रमणांनी व्यापलेले रस्ते मोकळे झाल्याचे चित्र दिसले. कारवाईदरम्यान काही ठिकाणी किरकोळ शाब्दिक वाद झाले.