नाशिक : मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी प्रकरणात आमदार रोहित पवार हे अधिवेशनाचे कारण देत नाशिक न्यायालयात गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायालयाने आता या प्रकरणाची सुनावणी १६ डिसेंबर रोजी ठेवली आहे. आमदार पवार यांच्या वतीने त्यांचे वकिलांनी न्यायालयात हजेरी लावली.
मंत्री कोकाटे रमी प्रकरणांमध्ये पोलिस तपासाचे आदेश यापूर्वीच न्यायालयाने दिले होते. त्यानंतर पोलिस विभागाला देखील तीन वेळा मुदत देण्यात आली. त्यानंतर रोहित पवार यांना मंगळवारी (दि.९) न्यायालयात हजर राहण्याचे आदेश बजावण्यात आले होते. मात्र, विधिमंडळ अधिवेशन सुरू झाल्यामुळे आपण उपस्थित राहू शकत नाहीत अशी माहिती रोहित पवार यांच्या वकिलांनी न्यायालयात दिली.
त्यावेळी न्यायालयाने पुढील १६ तारखेस हजर राहावे असे आदेश दिले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तत्कालीन कृषी मंत्री तथा विद्यमान क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. कोकाटे हे सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ आ. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यासंदर्भात मंत्री कोकाटे कोर्टात गेले आहेत. आमदार पवारांविरुद्ध त्यांनी फौजदारी खटला न्यायालयात दाखल केला आहे.