नाशिक : माजी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी रमी खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या बदनामीच्या फौजदारी खटल्याची सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली. याप्रकरणी मंगळवारी (दि.23) रोजी सुनावणी होणे अपेक्षित होते; मात्र आमदार रोहित पवार यांच्या वतीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व तयारी नसल्याचे न्यायालयास कळविण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने सुनावणीसाठी 30 डिसेंबरची तारीख निश्चित केली.
न्यायालयाने या प्रकरणात यापूर्वीच पोलिस तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिस विभागाला तीन वेळा मुदतवाढ दिली होती. तसेच रोहित पवार यांना ९ डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते; मात्र विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्यामुळे उपस्थित राहता येणार नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर नगर परिषद निवडणुकांची धामधूम सुरू झाली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान तत्कालीन कृषिमंत्री व विद्यमान क्रीडा व युवक कल्याणमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे सभागृहात मोबाइलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी व्हायरल केला होता. याप्रकरणी कोकाटे यांनी न्यायालयात दाद मागत रोहित पवारांविरोधात बदनामीचा फौजदारी खटला दाखल केला होता.