नाशिक, पुढारी वृत्तसेवा : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. सुनावणी संपेपर्यंत कोकाटे यांना १ लाख रुपयांचा जामीन न्यायमूर्ती नितीन जीवने यांनी आज (दि.२४) मंजूर केला आहे. (Manikrao Kokate)
माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे जावई वकील आशुतोष राठोड यांनी घेतलेला आक्षेपही न्यायालयाने फेटाळला. पण माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरील टांगती तलवार कायम आहे. मागील आठवड्यात कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा आणि ५० हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली होती.
माजी मंत्री तुकाराम दिघोळे हे साक्षीदार आणि तक्रारदार नव्हते. त्यामुळे जावई आशुतोष राठोड यांना न्यायालयाने फटकारले. उद्या सरकारी पक्षाचे वकील बाजू मांडणार आणि मग अंतिम निर्णय होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी संपेपर्यंत कोकाटे यांना १ लाख रुपयांचा जामीन मंजूर झाला आहे. आमदारकी रद्दबाबत सुनावणी संपेपर्यंत न्यायालयाच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.
1995 ते 97 मध्ये सरकारच्या 10 टक्के कोट्यातून घर घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता. याप्रकरणी माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या खटल्याचा निकाल तब्बल २९ वर्षांनी लागला असून, न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावास २ वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.