मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर कार्यालयातील टिपू सुलतान यांच्या छायाचित्रावरून निर्माण झालेला वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. या प्रकरणी महापालिकेच्या उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, याचिकेवर १६ सप्टेंबर रोजी मुख्य न्यायमूर्तींसमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे मालेगावच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
उपमहापौर कार्यालयात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावण्यात आल्यानंतर त्यावरून राजकीय वाद निर्माण झाला होता. विविध राजकीय पक्षांकडून या मुद्द्यावर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. तसेच छायाचित्र हटविण्याची मागणी करीत आंदोलन व निदर्शनेही करण्यात आली होती.
त्यामुळे हा विषय महापालिका राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. या प्रकरणाला आता कायदेशीर वळण मिळाले आहे. पोलिस प्रशासन, महापालिकेच्या नगरसचिवांनी छायाचित्र काढण्यासंदर्भात दिलेल्या पत्राला उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली असून, या प्रकरणातील वस्तुस्थिती, कायदेशीर तरतुदी आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे न्यायालयासमोर ठोस युक्तिवाद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
टिपू सुलतान यांचा उल्लेख व छायाचित्र संविधानाशी संबंधित अधिकृत संदर्भांमध्ये आढळत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्या बाजूने करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व म्हणून छायाचित्र लावण्याबाबत आक्षेप का, तसेच त्यांना महापुरुष मानले जात नाही का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
छायाचित्रावरून सुरू झालेला वाद आता थेट उच्च न्यायालयाच्या पातळीवर पोहोचल्याने १६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याचिकेवर न्यायालय कोणती भूमिका घेते, तसेच संबंधित प्रशासनाच्या पत्राबाबत काय निर्देश दिले जातात, याकडे मालेगावच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.