ठळक मुद्दे
डोंगराळे येथील बालिका अत्याचार, खून प्रकरणातील घटनेचा निषेध
मालेगावला न्यायालय प्रवेशद्वारावर राडा : सौम्य लाठीचार्ज
बालिका आत्याचारातील आरोपीला ताब्यात देण्याची नागरिकांची मागणी
मालेगाव (नाशिक) : डोंगराळे येथील बालिका अत्याचार व खून प्रकरणातील घटनेचा निषेध व आरोपीला फाशी मागणीच्या मागणीसाठी काढण्यात आलेला जनआक्रोश मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर नराधम आरोपीला न्यायालयात आणण्यात आल्याची अफवा पसरल्याने संतप्त झालेल्या काही तरुण व महिलांनी न्यायालय प्रवेशद्वाराच्या दिशेने धाव घेत गेट तोडून आत प्रवेश केला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत सौम्य लाठीचार्ज केल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता.
अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची मागणी देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि.21) रोजी मालेगावमध्ये बंद पाळत नागरिकांची मोर्चा काढला. मात्र, मोर्चाची सांगता झाल्यानंतर आरोपीला न्यायालयात आणण्यात आल्याची अफवा पसरल्याने काही आंदोलकांनी न्यायालयाचे मुख्य प्रवेशद्वार तोडत आरडा-ओरडा करत आत प्रवेश केला. यावेळी न्यायालयातील दरवाज्यांच्या काचा फोडण्याचा प्रयत्नही झाल्याने परिस्थिती गंभीर झाली होती. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगवित परिस्थिती आटोक्यात आणली. अशीच अफवा पुन्हा पसरल्याने कॅम्प रस्त्यावर गोंधळ उडाला होता. याच दरम्यान काही महिलांचा स्वतंत्र जथ्था आरोपीला फाशी द्या मागणीचे स्वतंत्ररित्या निवेदन देण्यासाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत असल्याने गोंधळात भर पडली. न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या गोंधळात महिलांचा देखील लक्षणीय सहभाग दिसून आला. या घटनेनंतर न्यायालय परिसरासह कॅम्प रस्त्यावर बंदोबस्त तैनात करण्यात आला. तरुणांची टोळकी, रस्त्यात लावलेली वाहने पोलिसांनी हाकलून लावली. तथापि, जमावातील काही महिला व तरुण स्टेट बँक चौकाकडून न्यायालयाच्या मागील दरवाजाकडे गेले. त्यांनी तेथेही घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. वस्तुस्थिती समजल्यानंतर जमावही शांत झाला व तणावही निवळला.
मालेगावला कडकडीत बंद
बालिका अत्याचार घटनेच्या निषेधार्थ मालेगावकरांनी आभूतपूर्व एकी दाखवत संपूर्ण शहरात शुक्रवारी कडकडीत बंद पाळला. यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट होता. सकाळी सातपासून सायंकाळी पाचपर्यंत अवघे शहर स्तब्ध झाले होते. पूर्व- पश्चिम भागातील सर्वच दुकाने, व्यापार, उद्योग, शाळा, महाविद्यालय, सिनेमागृह बंद होते. मालेगावमध्ये प्रथमच कडकडीत बंद व आफाट मोर्चो निघाल्याचे चित्र होते. मोर्चात हिंदू- मुस्लिम बांधवांची एकतेची वज्रमुठ दाखवून दिली. दरम्यान, शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घटनेचा निषेध नोंदवत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची हमी दिली.
तळपायाची आग मस्तकात जाणारी ही घटना आहे. त्या चिमुरडीला जशा वेदना झाल्या असतील, तशाच वेदना आरोपीला झाल्या पाहिजे, हीच सर्वांची मागणी आहे. पण कायद्यानुसार शिक्षा दिली जाईल, असे मत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे पिडीत कुटुंबीयांच्या घरी भेट देण्यापूर्वी नाशिकमध्ये त्या माध्यमांशी बोलत होत्या. चाकणकर म्हणाल्या, लैंगिक अत्याचाराच्या आरोपीला या आधी कमी शिक्षा होत होती. ती आता नवीन कायद्यानुसार कठोर केली आहे. याआधीच्या घटनांत महिला आयोगाने पाठपुरावा करत तीन गुन्ह्यातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात आली आहे. मी पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे म्हणणे जाणून घेणार असल्याचेही रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.