मालेगाव : शहरातील जुना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील नायरा पेट्रोल पंपामागे असलेल्या महापालिका शाळेच्या पटांगणात आयेशानगर पोलिसांनी छापा टाकून सुमारे ४६ हजार ४०० रुपये किमतीची गुंगी आणणारी औषधे जप्त केली. पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, सोमवारी (दि. १९) रात्री ९ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
आयेशानगर पोलिसांना शहरात बेकायदा नशेसाठी वापर होणाऱ्या औषधांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचत नायरा पेट्रोल पंपामागील बाजूस असलेल्या महापालिका शाळेच्या पटांगणात छापा टाकला. यावेळी शेख अलीम शेख मुश्ताक (२७, रा. जमूहरनगर, मालेगाव) हा संशयित गुंगी आणणाऱ्या कफ सिरपच्या ११६ बाटल्या स्वतःच्या ताब्यात बाळगताना आढळला.
पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ४६ हजार ४०० रुपये किमतीच्या ११६ बाटल्या जप्त केल्या असून, त्याला अटक केली आहे. पोलिस कर्मचारी नीलेश निकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आयेशानगर पोलिस ठाण्यात अलीमविरोधात विनापरवाना अवैधरीत्या नशेची आणि गुंगी आणणारी औषधे विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील अधिक तपास करीत आहेत.