मालेगाव (नाशिक) : शहरासह परिसरात मागील आठवड्यात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे मालेगाव विभागातील तीन मंडळांतील 13 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकाला फटका बसला.
माळमाथा, काटवनमधील 34 गावांतील सुमारे 19 हजार शेतकर्यांची खरीप पिके मातीमोल झाली. सोमवारी (दि. 22) मध्यरात्री व मंगळवारी (दि. 23) पहाटे वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसाचा मोठा फटका माळमाथ्यावरील कळवाडी व काटवन भागातील करंजगव्हाण, डोंगराळे या तीन मंडळांना बसला. महसूल, कृषी विभागाने संयुक्तपणे पंचनामे सुरू केले आहेत. पंचनाम्यात एकही शेतकरी वंचित राहू नये, सर्वांचे काटेकोर पंचनामे करावेत, अशा सूचना संबंधितांना दिल्याचे तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांनी सांगितले. विशेष म्हणजे नुकसान झालेल्या या तीनही मंडळांत सातत्याने टप्प्याटप्प्याने जोरदार पाऊस झाला. कळवाडी मंडळात 206 टक्के पाऊस झाला.
करंजगव्हाण मंडळात 155.5 टक्के, तर डोंगराळे मंडळात 132 टक्के पाऊस झाला. अतिवृष्टी झालेल्या दिवशी या तीन मंडळांत अनुक्रमे कळवाडी (108 मि.मी.), करंजगव्हाण (67.8), तर डोंगराळे (93.8) एकाच दिवसात 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने या तीनही मंडळांतील गावे नुकसानीस पात्र ठरत आहेत. या मंडळांतील प्रामुख्याने मका, बाजरी, सोयाबीन, कांदा, कापूस, भाजीपाला व फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कपाशी वेचणीला, तर मका काढणीला आला असतानाच पावसाने होत्याचे नव्हते केले. यातील बहुसंख्य गावांना राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, तहसीलदार व कृषी अधिकार्यांनी भेट देऊन पाहणी केली. नुकसानीची झळ पाहता राजकीय पक्षांचे पदाधिकारी व शासकीय अधिकार्यांनाही संबंधितांचे सांत्वन करणे अवघड झाले. अतिवृष्टीप्रमाणेच शेतकर्यांच्या डोळ्यांत अश्रूंचा पूर दाटला होता. दरम्यान, नुकसानीची पाहणी करतानाच आठवड्यात शासन मदत जाहीर करेल, असे सांगून मंत्री भुसे यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
ओला दुळकाळ जाहीर करावा : भाजपची मागणी
अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत. ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजप नेते प्रसाद हिरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. २६) तहसीलदार विशाल सोनवणे यांना या मागणीचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने कपाशी, बाजरी, डाळिंब, कांदा यांसह भाजीपाला नामशेष झाला. हातातोंडाशी आलेला घास गेला. घरांची पडझड व पशुधनाचेही नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर तातडीने नुकसानभरपाई द्यावी. शिष्टमंडळात भाजप जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे, दादा जाधव, शहराध्यक्ष देवा पाटील, लकी गिल, दीपक पवार, ॲड. चंद्रशेखर शेवाळे, रमेश बच्छाव, भाग्येश कासार आदींचा समावेश होता.
मालेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (दि. 26) पाहणी केली. शासन शेतकर्यांच्या पाठीशी आहे, असा दिलासा देतानाच त्यांनी शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे. एकही शेतकरी वंचित राहता कामा नये, याची काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या.
आपदग्रस्तांना एनडीआरएफच्या निकषानुसार आठवडाभरात नुकसान भरपाई देण्यात येईल, असे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले. तालुक्यातील करंजगव्हाण, हाताणे, झोडगे, दाभाडी, कळवाडी, सायने, डोंगराळे आदी गावात भेट देत नुकसानीची पाहणी करताना मंत्री भुसे बोलत होते. यावेळी तहसीलदार विशाल सोनवणे, तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे, पंचायत समितीचे गट विकासअधिकारी चंद्रकांत साबळे आदींसह संबंधित गावांचे सरपंच, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. मंत्री भुसे म्हणाले की, पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. पिके पाण्याखाली गेली. दोन दिवसांत पंचनामे प्राप्त होतील. परिसरातील वीज, पाणी या समस्याही सोडवाव्यात. अतिवृष्टीने नुकसान झालेले तलाव, पूल, रस्ते दुरुस्ती करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.