मालेगाव (नाशिक) : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत 'मालेगाव महाविकास आघाडी' स्थापनेची घोषणा शनिवारी (दि.13) उर्दू मीडिया सेंटर येथे पत्रकार परिषदेत करण्यात आली. या आघाडीत काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), सीपीआय, वेलफेअर पार्टी, एसडीपीआय (सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया), बसपा, राष्ट्रीय विकास काँग्रेस पार्टी, जमीयत उलमा हिंद पार्टी, सीपीएम, समाजवादी पार्टी, बहुजन वंचित आघाडी आदी पक्षांचा समावेश असून हे सर्व पक्ष आगामी महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढविणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महानगर प्रमुख सलीम रिजवी यांनी आघाडी स्थापनेमागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, शहराच्या सर्वांगीण विकासाचा ठोस अजेंडा घेऊन ही आघाडी स्थापन करण्यात आली आहे. घराणेशाहीला अटकाव करून नव्या, सक्षम आणि काम करणार्या चेहर्यांना संधी देण्याचा निर्णय आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे.
शिवसेना (उबाठा) गटाचे जितेंद्र देसले, कैलास तिसगे यांनी आघाडीला पक्षाचा पूर्ण पाठिंबा जाहीर करत मालेगाव शहरातील नागरिकांना मूलभूत व विकासात्मक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे हेच आघाडीचे प्रमुख ध्येय असल्याचे नमूद केले. एसडीपीआयच्या पदाधिकार्यांनी शहराची सद्यस्थिती अत्यंत बिकट असल्याची टीका करत विकासाच्या नावाने केवळ घोषणाबाजी होत असल्याचे सांगितले. वॉर्ड पातळीवर प्रत्यक्ष काम करणार्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची भूमिका त्यांनी मांडली. जनता दलच्या वतीने विकासाच्या नावावर होणार्या राजकारणावर टीका करण्यात आली. शैक्षणिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून मनपा शाळांचा दर्जा उंचावणे, तसेच शाळांच्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याच्या कथित मनसुब्यांना आळा घालण्यासाठी एकत्र आलो असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
सीपीएमचे अशोक सावंत यांनी मालेगाव हे मजुरांचे शहर असतानाही त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची खंत व्यक्त केली. यावेळी सीपीआय, बसपा, वेलफेअर पार्टी शहराध्यक्ष मुख्तार शेख, आयेशा सिद्दिकी, काँग्रेस सेलचे मयूर वांद्रे, मालेगाव शहर काँग्रेस अध्यक्ष यशवंत खैरनार यांनीही आपापल्या पक्षांच्या विकासात्मक अजेंड्यावर एकत्रितपणे काम करण्याची ग्वाही दिली.
महाआघाडी सक्षम पर्याय ठरेल : जावेद अन्वर
मालेगाव महाविकास आघाडीची स्थापना झाल्याची अधिकृत घोषणा करत शहराच्या विकासासाठी महाआघाडी ठोस पर्यार ठरेल असे जावेद अन्वर यांनी सांगितले तसेच महाआघाडीची भूमिका मांडली. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी काम करेल असा विश्वास व्यक्त केला.