मालेगाव (नाशिक ): प्रमोद सावंत
महापालिका सार्वत्रिक निवडणूक तब्बल साडेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत आहे. 15 जानेवारीला मतदान होणार असल्याने शहरात कडाक्याच्या थंडीत राजकीय वातावरण तापणार आहे. 70 टक्के मुस्लीमबहुल असलेल्या भागात प्रचाराची धार वाढेल. पूर्व भागात प्रामुख्याने सेक्युलर फ्रंट, महाविकास आघाडी व तिसरा महाज असा तिरंगी, तर पश्चिम भागात प्रामुख्याने भाजप- शिवसेना असा दुरंगी सामना रंगेल. पश्चिम भागात भाजप शिवसेना या सत्तारूढ पक्षांची युती न होता त्यांचे उमेदवार समोरासमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे.
शिवसेना नेते शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा उमेदवार निश्चितीत कस लागणार आहे. भाजपला गटबाजीचे ग्रहण सतावणार आहे. पूर्व भागात आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल व माजी आमदार आसिफ शेख या पारंपरिक विरोधकांमध्ये सामना रंगणार आहे. या महापालिका निवडणुकीतील वैशिष्ट्य म्हणजे गत निवडणुकीत आमदार मौलाना मुफ्ती यांच्याबरोबर महागठबंधनमध्ये सहभागी असलेल्या पूर्वाश्रमीचे जनता दल व आताचे समाजवादी पक्षाच्या शानेहिंद निहाल अहमद व मुस्तकिम डिग्निटी यांनी माजी आमदार शेख यांच्याशी युती करताना सेक्युलर फ्रंटची स्थापना केली आहे. ही स्थिती लक्षात घेता एमआयएम युतीसाठी कोणता भिडू निवडणार याची उत्सुकता आहे. काँग्रेसचे एजाज बेग व एमआयएम यांची तिसरा महाज नावाने पक्षविरहित आघाडी होऊ शकते. उमेदवारांना प्रचारासाठी प्रत्यक्ष अवघा बारा दिवसांचा कालावधी मिळणार आहे. चार सदस्यीय प्रभागरचनेत उमेदवारांची मतदारांपर्यंत पोहोचताना दमछाक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रभागात सातत्याने जनसंपर्क असणार्यांना सोयीचे होणार असले तरी नवख्या उमेदवारांची चिंता वाढली आहे. विधानसभा निवडणुकीतील दणदणीत यशाने मंत्री भुसे समर्थकांत उत्साह दुणावला असताना ‘मध्य’मधील विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती यांची मात्र कोंडी झाली आहे. सेक्युलर फ्रंटने उमेदवार निश्चिती, युती, प्रचार या सर्वातच पूर्व भागात आघाडी घेतली आहे. फ्रंटच्या नेते व पदाधिकार्यांनी पूर्व भाग पिंजून काढला आहे. पश्चिम भागात शिवसेनेकडे इच्छुकांची मोठी संख्या आहे. सर्वांना विश्वासात घेत उमेदवार निश्चिती डोकेदुखी आहे. भाजपकडे काही मातब्बर उमेदवार आहेत. तथापि, या पक्षातील मातब्बर नेत्यांमधील समन्वयाचा अभाव इच्छुकांची चिंता वाढविणारा ठरला आहे. एकसंधपणे निवडणुकीला सामोरे गेल्यास पश्चिम भागात भाजपही जोरदार लढत देईल. मात्र, एकमेकांच्या समर्थकांचा केसाने गळा कापण्याचे ठरल्यास उमेदवारांची पंचायत होणार आहे. सत्ता संपत्तीचे बळ मात्र त्यांच्यासाठी प्रभावी अस्त्र ठरेल. महापालिका निवडणुकीत आर्थिकद़ृष्ट्या सक्षम, प्रभागात दांडगा जनसंपर्क व मातब्बर चेहर्यांनाच संधी मिळण्याची शक्यता असली तरी सर्वच राजकीय पक्षांकडून बोटावर मोजण्याइतके काही नवीन चेहरे या निवडणुकीतून समोर येण्याची शक्यता आहे
महापालिकेतील गत निवडणुकीतील परिस्थितीत फेरबदल
महापालिकेची गत सार्वत्रिक निवडणूक सन 2017 मध्ये झाली. 21 प्रभागांतून 84 सदस्य विजयी झाले. त्यावेळी कोणत्याही पक्षाला बहुमताचा 43 हा जादूई आकडा गाठता आला नाही. काँग्रेसने सर्वाधिक 28 जागा मिळविल्या. त्यावेळी राज्यातील महाविकास आघाडीचा नव्या प्रयोगाचा अंक सर्वप्रथम मालेगावात पार पडला. काँग्रेस, शिवसेना व एमआयएमचा बाहेरून पाठिंबा, अशी विचित्र युती झाली. हाच प्रयोग नंतर राज्यात झाला. गत पाच वर्षांत काँग्रेसचे रशीद शेख व त्यांच्या धर्मपत्नी ताहेरा शेख यांनी महापौरपद भूषविले. तर शिवसेनेचे सखाराम घोडके व नीलेश आहेर यांना उपमहापौरपदाची संधी मिळाली. स्थायी समिती सभापतिपद काँग्रेस, शिवसेनेकडे आलटून पालटून होते. एमआयएमला बाहेरून पाठिंब्याच्या मोबदल्यात डॉ. खालिद परवेज यांच्या निमित्ताने वर्षासाठी स्थायी सभापतिपदाची संधी देण्यात आली होती. सध्या डॉ. खालिद परवेज विद्यमान आमदारांसमवेत आहेत.