मालेगाव : प्रमोद सावंत
महानगरपालिका महापौर, उपमहापौर निवडणूक पार पडल्यानंतर शहरात आता स्वीकृत सदस्य व स्थायी समिती सदस्य पदासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. या दोन्ही पदांसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थकांनी गटनेते, पक्षनेते, निवड समिती सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
स्थायी समिती सभापतिपद महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी पाठिंबा दिल्याने काँग्रेसला मिळणार तसेच सभापती पदासाठी एजाज बेग यांचे नाव निश्चित आहे. तथापि सदस्यांविषयी उत्सुकता आहे. स्थायी समितीत एकूण १६ सदस्य असतील. समितीतही 'इस्लाम'चे वर्चस्व असेल, तरीदेखील राजकीय तहात स्थायी समितीत एकमेव सदस्य असणाऱ्या काँग्रेसला संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २०२३ मधील नवीन तरतुदर्दीने महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची संख्या वाढणार आहे. यापूर्वी महानगरपालिकेत ५ स्वीकृत सदस्य होते. त्यात आता तीनने भर पडणार आहे.
मनपात आठ स्वीकृत सदस्य असतील. स्वीकृत नगरसेवक पदासाठी 'इस्लाम' व शिवसेनेच्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. स्वीकृत आठ नगरसेवकांपैकी 'इस्लाम'चे संख्याबळ पाहता, या पक्षातर्फे तिघांना संधी मिळेल. शिवसेना व एमआयएम तर्फे प्रत्येकी दोन, तर समाजवादी पक्षाच्या एका इच्छुकाला संधी मिळेल.
काँग्रेस व भाजपला मात्र संधी मिळणार नाही. या पक्षांनी भारत विकास आघाडी करून एकत्रित गटनोंदणी याच हेतूने केली होती. मात्र त्यांचा डाव या दोन्ही पक्षांच्या प्रदेश नेत्यांच्या कठोर भूमिकेमुळे असफल ठरला. अन्यथा समाजवादी व या गटात स्वीकृत व स्थायी समिती सदस्य पदासाठीदेखील चढाओढ अपेक्षित होती.
या वादातून व एकत्रित गटनोंदणी केल्यामुळे काँग्रेस पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष एजाज बेग यांना अध्यक्षपद गमवावे लागले. शिवसेना नेते तथा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मनपा निवडणुकीत सारे कसब पणाला लावून, बंडखोरी टाळण्यात यश मिळविले होते. 'इस्लाम 'चे संस्थापक माजी आमदार आसिफ शेख यांनीदेखील अनेक बंडखोरांना थोपविले होते.
मंत्री भुसे व माजी आमदार शेख यांनी मनपा निवडणुकीत अनेक इच्छुकांना स्वीकृत सदस्य करण्याचे आश्वासन दिले होते. आता निवडणुकीतील उमेदवार निश्चितीपेक्षाही स्वीकृत सदस्य निवडीत त्यांचा कस लागणार आहे. त्या तुलनेत एमआयएम व समाजवादी पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोजकीच आहे. एमआयएमतर्फे दोघांना संधी मिळेल. यात पक्षाचे गटनेते अब्दूल मालिका युनूस इसा यांचे वडील युनूस इसा अथवा बंधू माजीद युनूस इसा या दोघांपैकी एकाला संधी मिळणे निश्चित आहे.
समाजवादी पक्ष कोणाला संधी देणार याविषयी उत्सुकता आहे. दरम्यान, स्वीकृत सदस्य पदासाठीदेखील काही इच्छुकांनी मोठी आर्थिक उलाढाल करण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत एमआयएममध्ये चर्चा आहे. इस्लाम पक्षातर्फेदेखील पक्षनिधी घेतला जाण्याची शक्यता आहे.
या घडामोडींमुळे आर्थिकदृष्ट्या मातब्बरदेखील चाचपणी करीत आहेत. त्यामुळे पक्षनिष्ठा, सामान्य पदाधिकारी, कार्यकर्ते की, मातब्बर बाजी मारणार याची चर्चा सुरू आहे. राज्य शासनाने स्वीकृत सदस्य निवडीसाठी काही पात्रता व निकष निश्चित केले आहेत. त्यात तज्ज्ञ नगरसेवक यावे. त्यांच्या कामाचा व अनुभवाचा सभागृह तसेच प्रशासनाला फायदा व्हावा असा हेतू आहे.
पक्षनेते त्याचे पालन करणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे. एरवी मातब्बर पराभूत उमेदवार अथवा राजकीय सोय पाहूनच उमेदवारांना संधी दिली जाते. पात्रता व निकष यांना दुय्यम स्थान असते. आगामी महासभेत स्थायी समिती सदस्य व स्वीकृत नगरसेवक यांची निवड होईल. मनपातील संबंधित पक्ष व आघाडीचे गटनेते आपापल्या सदस्यांची नावे बंद लिफाफ्यात सादर करतील. महापौर हे पाकीट फोडून सदस्यांच्या नावाची घोषणा करतील. बहुधा रमजान ईद झाल्यानंतर आगामी महासभा होण्याची शक्यता आहे.
वादाचे विषय नको, सुसंवाद हवा
येथील महापौर, उपमहापौर निवडणूक पार पडल्यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला. जोमाने कामाला सुरुवात केली. महापौर नसरीन शेख यांनी स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य दिले आहे. स्वच्छता तक्रारींसाठी अॅप किंवा स्वतंत्र मोबाइल क्रमांक तयार करण्यात येणार आहे.
उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद या त्यांच्या दालनातील टिपू सुलतानच्या छायाचित्रामुळे चर्चेत राहिल्या. या वादातून शहर पुन्हा राज्यभर चर्चेत आले. नूतन महिला पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या अपेक्षा असताना, हा वाद शहराची बदनामी करणारा ठरला आहे. येथील राजकीय परिस्थिती व हिंदू - मुस्लीम समीकरण लक्षात घेता, नेते पदाधिकारी यांनी समतोल राखणे आवश्यक आहे. त्यांच्याकडून वादग्रस्त विषयांवर वाद निर्माण झाल्यानंतर सुसंवाद अपेक्षित आहे.