मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याच्या प्रकरणामुळे राज्यभरात चर्चेत आलेले मालेगाव शहर आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यालयात सामुदायिक नमाजपठण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
शासकीय कार्यालयात धार्मिक विधी पार पडल्याने प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील पवारवाडी परिसरात पथदीप बसविण्याच्या मागणीसाठी नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत होते. वारंवार निवेदने देऊनही विद्युत विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला.
अखेर लोकसंघर्ष समितीचे अध्यक्ष लुकमान कमाल यांच्या नेतृत्वाखाली कार्यकत्यांनी विद्युत विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनादरम्यान संबंधित अधिकारी बैठकीचे कारण सांगून कार्यालयाबाहेर गेले आणि बराच वेळ उलटूनही परतले नाहीत.
याच दरम्यान नमाजची वेळ झाल्याने, रमजान महिना सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि कार्यालयाबाहेर जाणे शक्य नसल्याने आंदोलकांनी थेट कार्यालयातच जानमाज पसरवून सामुदायिक नमाजपठण केले.
हा प्रकार व्हिडिओत कैद होऊन समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शासकीय इमारतीत नमाजपठण होणे हा नियमाचा भंग असल्याचे सांगत, दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, असे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाने या विषयावर सावध भूमिका घेतली आहे. गटनेते नीलेश आहेर यांनी हा धार्मिक विषय असल्याने त्याचे राजकारण करणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, शासकीय कार्यालयात नमाजपठण करणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले असून, प्रशासनाने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या प्रकरणावर मालेगाव महापालिका प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. अधिकारी बोलण्यास टाळाटाळ करीत असले तरी, सूत्रांच्या माहितीनुसार या घटनेप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही दिवसांपूर्वी टिपू सुलतानच्या फोटोवरून पाठोपाठ शासकीय कार्यालयातील नमाजपठणामुळे शहर पुन्हा एकदा राज्यभरात चर्चेत आले. यातून शहरात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न व तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.