Land Scam Pudhari
नाशिक

Malegaon Municipal Corporation |महापालिकेच्या भूखंडावर भूमाफियांचा डोळा

Malegaon Municipal Corporation | महापालिकेच्या भूखंडावर भूमाफियांचा डोळा

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

शहरातील सर्व्हे नंबर ६० मधील महापालिकेच्या मालकीचा सुमारे तीन एकरचा भूखंड हडप करण्याचा सुनियोजित प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप एमआयएमचे गटनेते अब्दूल मालिक यांनी केला. चंदनपुरी गेट परिसरातील संपर्क कार्यालयात गुरुवारी (दि. २६) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकरणाचा गौप्यस्फोट केला.

मलिक यांनी सांगितले की, शाबाननगर ते आयशानगर कब्रस्तानालगत असलेली ही तीन एकर जागा महापालिकेने १९८६ साली भविष्यातील विकासाचा दृष्टिकोन ठेवून खरेदी केली होती. या भूखंडावर पाण्याची टाकी तसेच सार्वजनिक शौचालये उभारण्यात आली आहेत.

मात्र, अलीकडील काळात काही भूमाफियांनी या जागेवर लक्ष केंद्रित करीत बळकावण्याचा डाव आखला आहे. मागील आठ दिवसांत तीन शासकीय शौचालये पाडण्यात आली असून, जेसीबीच्या साहाय्याने एक इमारतही भूईसपाट करण्यात आली आहे.

खासगी प्लॉट तयार करून २० ते २५ कोटी रुपये किमतीच्या या जागेची परस्पर विक्री करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. हा प्रकार केवळ महापालिकेच्या मालमत्तेवरच्या अतिक्रमणाचा प्रयत्न नसून, शहराच्या नियोजनावरचा घाला असल्याचे नमूद करीत मलिक यांनी सर्वच राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले. एमआयएमचे सर्व २१ नगरसेवक महापालिकेच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे सांगून, इस्लाम पार्टी, शिवसेना, भाजप, समाजवादी पार्टी आदी पक्षांनीही पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली.

विधानसभेत तारांकित प्रश्न

आमदार मुफ्ती इस्माईल यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. जागेची सर्व कागदपत्रे उपलब्ध असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले. आमदार मौलाना विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कायदेशीर लढ्यासाठी उच्च न्यायालयातील वकिलांशी संपर्क साधून ठोस पावले उचलण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महासभेत हा विषय चर्चेला घेऊन संबंधित भूमाफियांचे चेहरे जनतेसमोर आणावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT