Malegaon Municipal Corporation file photo
नाशिक

Malegaon Municipal Corporation | दोन दिवसांत 480 अतिक्रमणे हटविली

Malegaon Municipal Corporation | शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत दोन दिवसांत तब्बल ४८० कच्ची व पक्की अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत दोन दिवसांत तब्बल ४८० कच्ची व पक्की अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली. मंगळवारी (दि. ७) आयेशानगर कब्रस्तान ते शिव रोड येथील मासूम सायजिंग परिसरात, तर बुधवारी (दि. ८) किदवाई रोड भागात विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान संभाव्य कारवाई टाळण्यासाठी अनेक नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतल्याचेही दिसून आले.

महापालिकेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, रस्ते मोकळे करण्यास मोठी मदत होत आहे. अतिक्रमण हटवल्यामुळे वाहतुकीचा ताण कमी होण्याबरोबरच परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

विशेषतः गर्दीच्या भागातील रस्ते मोकळे झाल्याने वाहतुकीत सुटसुटीतपणा निर्माण झाला आहे. महापौर नसरिन शेख व आयुक्त रवींद्र जाधव यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. तसेच उपायुक्त डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने कारवाई केली.

यावेळी सहायक आयुक्त (अतिक्रमण) बाळू धोंडगे, अतिक्रमण अधीक्षक भरत सावकार, प्रभाग अधिकारी मोहम्मद इरफान, सचिन महाले, संतोष गायकवाड, श्याम बुरकुल यांच्यासह विट मुकादम अजय चांगरे, दिलीप निकम, संजू जगताप, रफीक शहा, कुणाल खैरनार तसेच अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, नागरिकांनी संभाव्य दंडात्मक व फौजदारी कारवाई टाळण्यासाठी स्वतःहून अतिक्रमणे हटवावीत, असे आवाहन महापौर नसरिन शेख व आयुक्त रवींद्र जाधव यांनी केले आहे. आगामी काळात शहरातील विविध भागांत अतिक्रमण निर्मूलन मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

चित्रीकरणावरून वाद; दोघांमध्ये मारहाण

या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान चित्रीकरणावरून दोन व्यक्तींमध्ये वाद होऊन त्याचे मारहाणीमध्ये रूपांतर झाल्याची घटना बुधवारी घडली. महानगरपालिकेच्या कारवाईदरम्यान एका व्यक्तीने मोबाइलवर अतिक्रमण काढण्याचे चित्रीकरण सुरू केले होते.

याचा राग आल्याने दुसऱ्या व्यक्तीने अतिक्रमण काढताना तू चित्रीकरण का करतो आहे, अशी विचारणा करत त्याच्याशी वाद घालत शिवीगाळ केली आणि मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच हाकेच्या अंतरावर असलेल्या शहर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT