Crime News pudhari photo
नाशिक

Malegaon Honey Trap Case | व्हिडिओ व्हायरलची धमकी देत खंडणीची मागणी

Malegaon Honey Trap Case | दोन महिलांसह सहा जणांविरुद्ध द्याने रमजानपुरा पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

शहरातील एका मजुराला नियोजनबद्ध पद्धतीने घरी बोलावून त्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याचा आरोप करत बदनामीची धमकी देऊन तब्बल तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रमजानपुरा पोलिस ठाण्यात दोन महिलांसह चार नामनिर्देशित व दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलाल अहमद यासीन कुरेशी (48, रा. कमालपुरा, मालेगाव) यांनी द्याने-रमजानपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 12 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास यास्मिन नावाच्या महिलेने फोन करून त्यांना चौधरी सायझिंगजवळ बोलावले.

तेथे यास्मिन व तिची बहीण फरीन या दोघी उपस्थित होत्या. त्यांनी बिल्लाल यांना नमरा कॉलनीतील एका घरात येण्यास सांगितले. बिल्लाल घरात प्रवेश करताच राजू गोल्डन व त्याच्यासोबत दोन अज्ञात व्यक्ती तेथे आले. त्यांनी यास्मिनसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत बिल्लाल यांना लाथाबुक्क्यांनी व काठ्यांनी मारहाण केली. तसेच त्यांचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची व बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. याच वेळी आरोपींनी तीन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तसेच बिलाल यांची दुचाकी (एमएच 41 बीवाय 2764) व दुचाकीचे मूळ कागदपत्रेही आरोपींनी ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी यास्मिन (रा. मच्छी बाजार), फरीन (रा. रमजानपुरा), राजू गोल्डन (रा. कमालपुरा) तसेच दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीतील आरोपांची विविध अंगांनी पडताळणी केली जात असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तपासाअंती पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी

धमक्यांमुळे घाबरलेल्या बिलाल यांनी नातेवाईक व परिचितांकडून पैसे गोळा करून 14 एप्रिल 2026 रोजी आरोपी राजू गोल्डन याला एक लाख रुपये दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र त्यानंतरही उर्वरित रकमेची मागणी सुरूच राहिली. आरोपींकडून वारंवार फोन करून पैसे मागण्यात येत होते. तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली जात होती. अखेर बिल्लाल यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती आपल्या भाऊ जमाल अहमद यांना दिली. त्यानंतर दोघांनी द्याने-रमजानपुरा पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT