मालेगाव : १) आझादनगर भाजी बाजार २) गांधीनगर भाजी मार्केट ३) जुना आग्रा रोड, ४) क्रीडा संकुल. (सर्व छाया : सादिक शेख) 
नाशिक

Malegaon Heavy Rain Dam Water Release | संततधारेने मालेगावची दैना, धरणांमधून विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

संततधारेने मालेगावची दैना, धरणांमधून विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : शहर व परिसरात गुरुवार (दि. ३०) रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून, खड्यांमध्ये पाणी भरल्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटनाही घडल्या.

सखल भागांमध्ये पाणी साचल्याने तसेच नाले आणि गटारांचे पाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधीची समस्या निर्माण झाली आहे. शहरातील विविध भागांत भुयारी गटार प्रकल्पाची कामे सुरू असल्यामुळे रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना दैनंदिन ये जा करताना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, गिरणा, मोसम आणि परिसरातील लहान - मोठे नाले - ओढे दुथडी भरून वाहात आहेत. धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस कायम असल्यामुळे चणकापूर, पुनंद, ठेंगोडा, हरणबारी आणि केळझर धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

गिरणा, मोसम आणि आरम नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रात जाणे टाळावे, नदीकाठावरील जनावरे, वाहने व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत असून, परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT