मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील डोंगराळे येथील अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार व हत्या प्रकरणाच्या खटल्यातील अंतिम युक्तिवादाची प्रक्रिया सोमवारी (दि. २१) पूर्ण झाली. सरकार पक्ष आणि आरोपीच्या वतीने करण्यात आलेल्या अंतिम युक्तिवादानंतर न्यायालयाने ३० सप्टेंबर २०२६ रोजी निकाल जाहीर करण्याची तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे सुमारे १० महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेचा न्यायालयीन प्रवास आता निर्णायक टप्प्यावर आला आहे.
डोंगराळे येथे दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी चारवर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली होती. यामुळे मालेगाव तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करीत डोंगराळे परिसरात तसेच मालेगाव शहरात आंदोलने, मोर्चे आणि विविध प्रकारची निदर्शने करण्यात आली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, शासनाने या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. मालेगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली.
लेखी युक्तिवादही सादर
न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान सरकार पक्षाने एकूण २४ साक्षीदार तपासले. त्यांच्या साक्षी तसेच आरोपीच्या वतीने करण्यात आलेली उलटतपासणी पूर्ण झाली. त्यानंतर प्रकरणातील उपलब्ध पुरावे व कायदेशीर मुद्द्यांवर दोन्ही बाजूंकडून अंतिम युक्तिवाद करण्यात आला.
सोमवारी (दि. २१) झालेल्या अंतिम सुनावणीस ॲड. उज्ज्वल निकम तसेच आरोपीच्या वतीने वकील व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी झाले होते. विशेष सरकारी वकील ॲड. संजय सोनवणे आणि मूळ फिर्यादीतर्फे ॲड. स्नेहा शर्मा - ठाकरे न्यायालयात उपस्थित होत्या. ॲड. निकम यांनी तोंडी युक्तिवादासोबत लेखी युक्तिवादही न्यायालयात सादर केला.
आंदोलनांपासून निकालापर्यंत
घटनेनंतर डोंगराळे ग्रामस्थांसह मालेगावातील विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. आंदोलनांमुळे प्रकरणाला व्यापक सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले. त्यानंतर तपास, दोषारोपपत्र, साक्षीदारांची तपासणी व उलटतपासणी अशा विविध टप्प्यांतून हा खटला पुढे गेला. आता दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
घटना : १६ नोव्हेंबर २०२५
ठिकाण : डोंगराळे, ता. मालेगाव
प्रकरण : बालिकेवरील अत्याचार व हत्या
विशेष सरकारी वकील : ॲड. उज्ज्वल निकम
सरकार पक्षाचे साक्षीदार : २४
अंतिम युक्तिवाद : २१ सप्टेंबर २०२६ रोजी पूर्ण
निकाल : ३० सप्टेंबर २०२६